फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील एका प्राध्यापकाने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे एका जखमी घुबडाला नवजीवन मिळाले आहे. मोहिते महाविद्यालयाचे प्रा. नवनाथ शिंगवे हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी महाविद्यालयातून कोचाळे या आपल्या गावी जात होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला वेदनेत विव्हळणारे एक जखमी घुबड त्यांच्या नजरेस पडले. तात्काळ माणुसकीचा परिचय देत त्यांनी त्या पक्ष्याला रुमालात गुंडाळून उब दिली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला.
घुबड हे स्पॉटेड अव्लेट (ठिपके वाला पिंगळा) जातीचे असून शेतीसाठी उपयुक्त अशा पक्षांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. हे पक्षी उंदीर व तत्सम कीटक खाऊन शेतीचे संरक्षण करतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत घुबडाला विशेष महत्त्व दिले जाते. लक्ष्मी देवीचे वाहन म्हणूनही त्याचं स्थान पवित्र मानलं जातं. प्रा. शिंगवे यांनी देखील याच भावनेने प्रेरित होऊन, केवळ एक प्राध्यापक म्हणून नव्हे तर एका शेतकऱ्याच्या मुलाच्या भूमिकेतून त्या पक्ष्याला जीवदान दिले, असे ते नम्रपणे सांगतात.
घटनेनंतर प्रा. शिंगवे यांनी खोडाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ चौधरी यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली. चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार घुबडाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यानंतर त्याला ठाणे येथील वन्यजीव उपचार विभागात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. वनरक्षक भास्कर धोंडमारे, शुभम खडके, जावेद खान, साजिद खान, मोरे इत्यादींनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. अखेर ‘रेस्क्यू असोसिएशन वेल्फेअर, मुलुंड’ या संस्थेमार्फत त्या जखमी घुबडाला सुरक्षित उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या छोट्याशा घटनेतून प्रा. नवनाथ शिंगवे यांनी दाखवलेली पशुप्रेमाची भावना आणि सामाजिक बांधिलकी खरोखरच प्रेरणादायी आहे. जेव्हा बहुतांश लोक मुक्या जीवांकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा शिंगवे यांच्यासारखा संवेदनशील प्राध्यापक आपल्या कृतीतून समाजात माणुसकीचे उदाहरण निर्माण करतो. त्यांच्या या कृत्यामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक संदेश दिला गेला आहे.