वसई । रविंद्र माने : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ‘सिरियल रेपिस्ट’ला सुरतमधून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दितील ७ वर्षीय मुलीवर एका २५ ते ३० वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केला होता. पिवळा टि-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट त्याने घातली होती. याप्रकरणी ३७७, ३६३ कलमांसह पोस्को ४, ६, ८, १० गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडले होते. त्यामुळे या सिरीयल रेपिस्टचा बारकाईने तपास करण्यात येत होता. त्यासाठी गुन्हे शाखा कक्ष – २ वसई कार्यालयाचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.
गुन्ह्यांच्या घटनास्थळावरून आरोपी पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. या फोटोच्या आधारे त्याचा शोध करण्यात येत होता. या सिसिटिव्हीचा मार्ग काढत असताना, हा सिरीयल किलर नालासोपारा एस.टी.डेपो जवळील झोपडपट्टी आणि डोंबिवली येथे रहात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. त्यात सिरीयल किलरचा मोबाईल नंबर त्यांच्या हाती लागला. मोबाईलचे लोकशन तापसल्यावर तो अजमेर एक्सप्रेसमधून प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले. या ट्रेनचा माग काढत गुन्हे शाखेचे पथक गेले असताना, आरोपी सुरत शहरात उतरल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुरत सिटी क्राईम ब्रँचच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.
सदरचा सिरीयल किलर मुळचा देसुरी राजस्थान येथील असून, तो सध्या नालासोपारा एस टी डेपोकडील झोपडपट्टीत रहायला होता. त्याची कसून चौकशी केल्यावर या गुन्ह्यापुर्वी ४ ते ५ महीन्या अगोदर ओसवाल नगरी, बाबा संकुल नालासोपारा पूर्व येथे एका ७ ते ८ वर्षाच्या मुलीला बिल्डींगच्या आडोशाला नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, हवालदार रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, अमोल कोरे, केकान, चौधरी, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सुरत सिटी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रविण सिंह पडियार, सहाय्यक फौजदार, शैलेश दुबे, फरीद खान, हवालदार मनोज पाटील, रवि चव्हाण, सत्ता भाई, आशिष दिव्होरा, दिनेश रबाडी यांनी ही कामगिरी केली.