जंगलाच्या जिल्ह्यात बांबूचा तुटवडा! आदिवासी कारागीर हवालदिल; कच्च्या मालाअभावी पारंपरिक उद्योग ठप्प
जंगलसमृद्ध जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीतच सद्यस्थिीतीत बांबूचा तीव तुटवडा निर्माण झाल्याने स्थानिक आदिवासींच्या पारंपरिक लघुउद्योगावर मोठा घाला बसला आहे. गत १५ दिवसांपासून कच्चा माल मिळत नसल्याने शेकडो कारागीर अक्षरशः हातावर हात धरून बसले आहेत. परिणामी त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(फोटो सौजन्य – AI)
गडचिरोलीतील आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या बांबुपासून विविध कलात्मक वस्तू तयार करून आपला उदरनिर्वाह करतात. या वस्तूंना केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. मात्र, आज बांबूच उपलब्ध नसल्याने हा संपूर्ण उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. काम आहे. मागणी आहे, पण कच्चा मालच नाही, अशी हत्ताश प्रतिक्रिया कारागिरांकडून व्यक्त होत आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही कुणाचेही याकडे लक्ष नाही. उलट बाहेरील जिल्ह्यांतील बांबू ठेकेदार गडचिरोलीत येऊन दादागिरी करत असल्याचे गंभीर आरोप कारागिरांनी केले.
स्थानिकांना बांबू मिळत नाही, पण बाहेरील ठेकेदार मात्र मोठ्या प्रमाणात साठा उचलत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ‘आमच्या पोटाचा प्रश्न आहे, पण प्रशासनाला काहीच पडलेले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका कारागिराने व्यक्त केली. बांबू व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून अनेकांना स्थलांतराचा पर्याय निवडण्याची वेळ येऊ लागली आहे.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्थानिक आदिवासींना प्राधान्याने बांबू उपलब्ध करून देणे, ठेकेदारांच्या मनमानीवर नियंत्रण ठेवणे आणि या पारंपरिक उद्योगाचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, गडचिरोलीची ओळख असलेला हा कलात्मक उद्योग संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने कृती करून बांबू उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कारागिरातून केली जात आहे.






