File Photo : Fire
सेलू : वर्धा-नागपूर मार्गावरील धनोडी येथे ऊसाच्या ट्रॅक्टरला अचानक आग लागली. साखर कारखान्यात ऊस घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून वाहनाबाहेर पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला. शिवाय ऊस लादलेली दोन्ही ट्रॉली वेळीच दूर करण्यात आल्याने मोठे नुकसान टळले. मात्र, या घटनेत ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
हेदेखील वाचा : Coldplay Concert साठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या; मुंबई, अहमदाबाद दरम्यान धावणार ट्रेन
वर्धा-नागपूर मार्गावरील धनोडी शिवारात घडली. या घटनेनंतर एकच चर्चा सुरु झाल्या. शेतकरी गौतम नारायण जिवणे (रा. गोंदापूर) यांच्या पवनार शिवारातील शेतातून ट्रॅक्टरने (एमएच-32/पी-4590) दोन ट्रॉलीमध्ये लादण्यात आलेला ऊस बेला येथील साखर कारखान्यात नेला जात होता. दोन ट्रॉलीत असलेला सुमारे 12 टन ऊस घेऊन ट्रॅक्टर धानोली मेघे शिवारात आला असता अचानक इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
त्यानंतर चालक रवींद्र किसना मडावी (रा.कान्हापूर) याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला थांबविला. शिवाय वाहनाबाहेर पळ काढला. त्यानंतर क्षणातच आगीने ट्रॅक्टरला आपल्या कवेत घेतले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आणि दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेटता ट्रॅक्टर बाजूला करून ऊस असलेल्या ट्रॉली आगीपासून दूर करण्यात आल्या. जळता ट्रॅक्टर वेळीच ट्रॉलीपासून वेगळा केल्याने ऊस थोडक्यात बचावला.
‘वायरिंग शॉर्ट’मुळे घटना घडल्याचा अंदाज
अपघातग्रस्त ट्रॅक्टर संदीप दादाराव बोरकर (रा. गोंदापूर) यांच्या मालकीचा असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रॅक्टर जळाल्याची माहिती मिळताच सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रीतम नीमगडे, निरंजन वरभे, सचिन उपाध्यय तसेच वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. शिवाय आग आटोक्यात आणत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेदेखील वाचा : Jalgaon Railway Accident : ‘घटना अतिशय वेदनादायी’; जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर