सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिक्रापूर : तब्बल पंधरा वर्षापासून पश्चिम बंगालमधील आई -वडील व कुटुंबीयांपासून दुरावलेल्या व महाराष्ट्रात मोलमजुरी करणाऱ्या एका तरुणाचा कुटुंबियांशी संपर्क झाला. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात गुगलसारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून हा संपर्क झाला आहे, या घटनेमुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.
पाबळ (ता. शिरुर) येथे सध्या वस्त्यव्यास असलेला बादल पात्र हा चाळीस वर्षीय तरुण पश्चिम बंगालमधील मिदणापूर जिल्ह्यातील बामंडा गावचा आहे. काही कारणास्तव पंधरा वर्षापूर्वी तो आपल्या आई- वडील व कुटुंबियांना सोडून महाराष्ट्रात आलेला आहे, पाबळ येथे येथे मोलमजुरी करत असताना येथेच तो स्थिरावला. काम करताना त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटून पंधरा वर्षे त्याचा कुटुंबाशी कुठलाही संपर्क अथवा कोणाचाही फोन नंबर नव्हता. शासकीय कागदपत्रे नसल्यामुळे त्याला मोबाईलचे सिम कार्ड मिळत नव्हते,
सात ऑक्टोबर रोजी मंगळवारी त्याने पाबळचे सरपंच सोपानराव जाधव व पत्रकार प्रशांत मैड यांना भेटून आपल्याला कुटुंबाशी संपर्क साधायचा असे सांगितले. त्याला फक्त गावाचे नाव माहित असल्याने सरपंच सोपानराव जाधव व प्रशांत मैड यांनी गावाचे नाव गुगलवर सर्च करून कोणाचातरी नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पच्छिम बंगाल मधील शेजारील एका गावातील एक मोबाईल नंबर गुगलद्वारे मिळाल्याने जाधव यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना बादल पात्रबाबत माहिती दिली. यांनतर दोन दिवसांनी सदर व्यक्तीने पुन्हा जाधव यांना फोन करत कुटुंबाशी संपर्क झाल्याचे सांगून त्यांचा नंबर दिला.
संवाद साधत मोकळी केली भावनांची वाट
सायंकाळी बादल पात्र त्याच्या मजुरीच्या कामाहून परत येताच जाधव यांच्या माध्यमातून बादलच्या कुटुंबियांची व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे केल्याने आपला बादल पाबळ गावामध्ये जिवंत असल्याची जाणीव कुटुंबियांना झाल्याने आनंद झाला. बादलचे आई, भाऊ व कुटुंबियांनी एक तास संवाद साधत त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून दिली. दरम्यान दोन्ही बाजूने सर्वांना अश्रू अनावर झाले होते.
पंधरा वर्षांपासून कुटुंबीय घेत होते शोध
तब्बल पंधरा वर्षे बादलचे कुटुंबीय त्याला शोधत असताना आपला मुलगा जिवंत आहे की नाही याची सुद्धा त्यांना चिंता होती. अखेर बादल याच्याशी संवाद झाल्यावर कुटुंबाने त्याला तातडीने पश्चिम बंगालला बोलवले असल्याने आपण गावातील कालीमाता देवीच्या पूजेच्या दरम्यान पश्चिम बंगालला परतणार असल्याचे बादलने सांगितले. अश्रू भरलेल्या डोळ्यांनी बादलसह त्याच्या कुटुंबीयांनी सरपंच सोपानराव जाधव व प्रशांत मैड यांचे आभार मानले.