फोटो - टीम नवराष्ट्र
जुन्नर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीने देखील तयारी सुरु केली आहे. काल अजित पवार गटाने प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आज शरद पवार गटाने देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. शिवजन्मभूमी जुन्नरपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्यापासून शिव स्वराज्य यात्रा सुरु होणार आहे. आजपासून शरद पवार गटाचे नेते लोकांशी संवाद साधणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेवेळी अपघात झाला आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावले आहेत.
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी दर्शन घेतले. पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन शरद पवार गटाने प्रचाराला सुरुवात केली. यावेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये अभिवादन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते हार अर्पण करत होते. हार अर्पण करण्यासाठी अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्यासह काही पदाधिकारी क्रेनमध्ये चढले. मात्र येताना संपूर्ण क्रेनची ट्रॉलीच वाकडी झाली. यामुळे सर्व लोकं घाबरले. उंचावर गेलेली क्रेनची ट्रॉली वाकडी झाल्याने पडण्याची शक्यता होती. वाकडी झालेल्या क्रेनमध्ये लोकं खाली बसले आणि अगदी काही वेळामध्ये क्रेन खाली आणण्यात आली. यामध्ये मोठा अपघात टळला. अमोल कोल्हे व जयंत पाटील थोडक्यात बचावले आहेत.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना क्रेनची ट्रॉली बिघडली. यावेळी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते घाबरले होते. जयंत पाटील यांना कार्यकर्त्यांनी हात धरुन बाहेर काढले. सर्व नेते सुखरुप बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आधी त्यांना बाहेर काढले. यावेळी कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मात्र क्रेनचा वापर सध्या वाढला असून यामध्ये अपघात होण्याची शक्यता असते. क्रेनच्या सहाय्याने हार अर्पण करणे, फुलांची उधळण करणे, मोठमोठाले हार अर्पण करणे याचे प्रमाण वाढले आहे. मात्र यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. जुन्नरमध्ये झालेल्या या अपघातामध्ये जयंत पाटील व अमोल कोल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.