दिरम ऐवजी हातात आले रद्दीचे बंडल, औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा; दोघांना अटक
दुबईचे 700 दिरम देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखाचा गंडा घातल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. औषध विक्रेत्याला गंडा घालणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते. त्यांच्या तपासाला आता यश आलं असून मानपाडा पोलिसांनी दोन भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
हेदेखील वाचा- न्यायालयात सादर केलं लिव-इन रिलेशनशिप अॅग्रीमेंट आणि मिळाला जामीन; काय आहे प्रकरण
मानपाडा पोलिसांनी डोंबिवली जवळील खोणी पलावा परिसरात सापळा रचत दोन भामट्यांना अटक केली आहे .मोहम्मद शेख व मोहम्मद चौधरी असे या दोन्ही आरोपींची नाव आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. हे दोन्ही आरोपी नागरिकांना दुबईतील चलन दिरम देण्याचे आमिष दाखवून त्या मोबदल्यात लाखो रुपये उकळत होते. आपली नाव बदलून नागरिकांची फसवणूक करत होते. दोन्ही आरोपींनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याची देखील फसवणूक केली होती. शिलाय या दोन्ही आरोपींनी आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका औषध विक्रेत्याला तीन अनोळखी इसमानी दुबई देशाचे चलन असलेले सातशे दिरम देतो, असे सांगत त्या मोबदल्यात तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केली. औषध विक्रेत्याला या तिन्ही आरोपींचा विश्वास वाटल्याने त्याने या तिघांना 4 लाख रुपये दिले. या तिघांनी त्याच्या हातात एक बंडल ठेवले आणि त्यानंतर ते तिघेही पसार झाले. बंडल उघडून पाहताच त्यात कागदाची रद्दी असल्याचे औषध विक्रेत्याच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याने त्याने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
हेदेखील वाचा- शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई
या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संपत फडोळ, महेश राळेभात, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या गुन्ह्यातील दोन जण खोणी पलावा परिसरातील येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी या परिसरात सापळा रचला.
पोलिसांना खोणी पलावा परिसरात दोन संशयित इसम फिरताना आढळले. काही वेळातच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी दोन्ही आरोपींनी पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी मोहम्मद शेख व मोहम्मद चौधरी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून 1 लाख 78 हजार रुपयांची रोकड, युनायटेड अरब अमीरत सेंट्रल बँकेचे नावे असलेले शंभर रुपये किमतीचे दिरम, दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.