File Photo : Pratiksha Gaware
छत्रपती संभाजीनगर : डॉ. प्रतिक्षा गवारे या डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. प्रतीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी ती रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये होती. त्यावेळी आरोपीने पीडितेला वारंवार फोन केले. त्यानंतर पीडितेने त्याला मेसेज टाकून हा शेवटचा मॅसेज असल्याचे सांगितले व आत्महत्या केली.
हेदेखील वाचा : ‘मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा…’, पत्र लिहून पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या
आरोपी पती प्रीतम गवारे (वय 26, रा. करंजखेडा ता. कन्नड ह.मु. प्रफुल्ल हौ.सो. बजरंगचौक) हा प्रतीक्षावर संशय घेत होता. मात्र, लग्नापूर्वीच त्याचे अफेअर असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. जवळगेवकर यांनी दिले. अॅड. सय्यद शेहनाज यांनी हा गंभीर गुन्हा असून, आरोपीने प्रतिक्षाला मेसेज व कॉल करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, असे सांगितले.
हुंडा मागण्यात इतर कोणाचा सहभाग आहे का?
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करायची आहे. प्रतिक्षाला आरोपींनी हुंडा स्वरुपात पैशांची मागणी असून, यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालकयाडे केली. त्यानुसार, आरोपी प्रीतम याला 31 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भाड्याच्या घरात केली आत्महत्या
प्रतीक्षाने 24 ऑगस्ट रोजी दुपारी तिच्या एन-6 सिडको येथील भाड्याच्या घरात आत्महत्या केली. प्रतीक्षा ही पती आणि सासरच्यांसोबत तिथे राहत होती. आरोपी पती आणि घरमालकाने प्रतीक्षाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षाचा मृत्यू झाल्याचे आरोपी पतीला समजताच त्याने रुग्णालयातून पळ काढला.
हेदेखील वाचा : बनावट लग्न लावून पैसे उकळायचे ‘ते’; पोलिसांना माहिती मिळताच रोख रकमेसह घेतले ताब्यात
…तरीही तो आला नाहीच
आत्महत्येपूर्वी प्रतीक्षाने लिहिलेल्या चिठ्ठीत मला टाईट हग करून चितेवर ठेवा, अशी विनंती केली होती. मात्र, याप्रकारानंतर संशयित पती आणि त्याचे कुटुंबीय प्रतीक्षाच्या अंत्यविधीलाही गेले नसल्याची माहिती दिली जात आहे.






