File Photo : Fraud
मुंबई : एक अभिनेत्री ऑनलाईन कुरिअरच्या फसवणुकीला बळी पडली असून, तिची ५.७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्याने तिच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा केला आणि तिच्या तीन बँक खात्यातून रक्कम काढली. डीएन नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी, हिंदी, तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आणि गिलबोर्ट हिल रोड, अंधेरी पश्चिम येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय अंजली पाटील हिला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला.
कॉलरने आपली ओळख दीपक शर्मा अशी करुन देत तो कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. २८ डिसेंबर रोजी फेडेक्स कुरिअर कंपनीच्या वतीने शर्माने तिला कळवले की तैवानला जाणाऱ्या तिच्या नावाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज होते. ज्यामुळे सीमाशुल्क विभागाने ते जप्त केले. पार्सलमध्ये तिच्या आधार कार्डची प्रत सापडल्याचा दावा त्याने केला. थोड्या वेळाने, तिला स्काईपद्वारे मुंबई सायबर गुन्हे विभागातील अधिकारी बॅनर्जी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा दुसरा कॉल आला. तिला खोटे सांगितले की, तिचे आधार कार्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या तीन बँक खात्यांशी जोडलेले आहे.
पुढे त्याने पडताळणी प्रक्रियेसाठी ९६,५२५ च्या प्रोसेसिंग फीची मागणी केली, जी तिने गुगल पेद्वारे फसवणूक करणाऱ्याने दिलेल्या नंबरवर भरली. स्काईप कॉलवर असताना बॅनर्जी यांनी दावा केला की बँक अधिकारी मनी लाँड्रिंग घोटाळ्यात सामील असू शकतात. त्यामुळे पुढील तपासासाठी ४,८३, २९१ पाठवावे लागतील.
अंजली पाटील हिने तिच्या ऍक्सिस बँक खात्यातून पंजाब नॅशनल बँक खात्यात त्वरित रक्कम हस्तांतरित केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. अंजली पाटीलच्या तक्रारीवरुन माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांसह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.