आदिराज पाटील-उंडाळकरांच्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला ; पायाला जखमा, प्रकृती स्थिर
शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आटोपून आदिराज पाटील हे दुचाकीवरून घरी परतत असताना उंडाळे-शेवाळेवाडी रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्यात आदिराज पाटील यांच्या पायाला जखमा झाल्या. यावेळी दुचाकीवर धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते.
हल्ल्यानंतर दोघांनी प्रसंगावधान राखत तातडीने लोकवस्तीकडे धाव घेतली. त्यानंतर आदिराज पाटील यांना उपचारासाठी उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
उदयसिंह पाटील-उंडाळकर हे कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आदिराज पाटील हे परिसरात कार्यकर्त्यांशी संपर्क साधत होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बिबट्याच्या वावराबाबत नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. या भागात वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिरज पश्चिममध्ये लाळ्या आजाराचा उद्रेक; मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळेत जनावरे मृत्युमुखी
दरम्यान, मला काहीही झालेले नाही. सर्वांनी आपापले बूथ सांभाळा. कुणीही भेटायला येऊ नका. मी उद्या बूथवर भेट द्यायला येणार आहे, असे आवाहन आदिराज पाटील-उंडाळकर यांनी सोशलमाध्यमांवरून कार्यकर्त्यांना केले. त्यानुसार शनिवारी येळगाव जिल्हा परिषद गटातील काही बूथसह लगतच्या पंचायत समिती बूथवरही त्यांनी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह वाढल्याचे दिसून आले.
मला काहीही झालेलं नाही. कोणीही भेटायला येऊ नका. सर्वांनी आपापले बूथ सांभाळा, असा संदेश आदिराज पाटील-उंडाळकर यांनी दिला आहे.






