Khed ZP Election 2026: खेडमध्ये 'जागर' लोकशाहीचा: अमिषांना झुगारून मतदानावर भर देण्याचा मतदारांचा निर्धार
Khed ZP Election 2026: खेड व तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये स्पष्ट बदल जाणवू लागला आहे. जनतेशी कोणतीही नाळ नसलेले व विकासाचा ठोस आराखडा नसलेले काही धनदांडगे उमेदवार पैशांच्या जोरावर निवडून येण्याचा प्रयत्न करीत असले, तरी मतदार अशा प्रवृत्तींना नाकारण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण असून सर्वत्र निवडणूक वातावरण तापले आहे. मात्र यंदा मतदार केवळ पैशांच्या आमिषाला बळी न पडता उमेदवारांच्या कामगिरीकडे आणि विकासाच्या अहवालाकडे लक्ष देत असल्याची चर्चा सुरू आहे.
Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी
“कितीही पैसे वाटा, पण मत मात्र आमच्या मनातील उमेदवारालाच, अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. एकदाच पैशांच्या आमिषाला बळी पडल्यास पुढील पाच वर्षे विकासावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार कमी होतो, याची जाणीव मतदारांना झाली आहे. विशेषत: तरुण पिढी रोजगाराच्या संधी, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण सुविधा यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात आहे. मतदार आता केवळ ‘नीट’ पाहत नसून उमेदवाराचे चारित्र्य, कामाचा आलेख आणि विकासाची दृष्टी तपासत असल्याचे दिसत आहे.
मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना काही उमेदवारांकडून पैशांचे वाटप व विविध आमिषे दिली जात असल्याच्या चर्चा तालुक्यात रंगल्या आहेत. मात्र निवडणूक नियंत्रण पथके केवळ नावालाच कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “जर विजयाची खात्री आहे, तर पैशांची उधळपट्टी कशासाठी?” असा सवालही सुज्ञ मतदार उपस्थित करत आहेत.
PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड
काही उमेदवारांकडून भावनिक वातावरण निर्माण करून ‘ही शेवटची निवडणूक’ असल्याचे सांगणे, तर काही ठिकाणी मतदारांसमोर आर्जव व अश्रू ढाळण्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. तसेच दारू, मटण, बिर्याणी यांसारख्या पार्टीची चर्चा देखील रंगत आहे. मात्र स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार अशा प्रकारांपासून दूर राहून थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यापूर्वी विकासकामांच्या जोरावर काही लोकप्रतिनिधींनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. मात्र निवडून आल्यानंतर वॉर्डात न फिरकल्याने काही सदस्यांविरोधात नाराजीही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तुल्यबळ लढतीमुळे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. एकूणच, खेड तालुक्यात यंदाची निवडणूक ‘पैसा विरुद्ध विकास’ अशी ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, अंतिम कौल विकासाभिमुख उमेदवारांच्या बाजूने जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






