सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर/दीपक घाटगे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल मतदार संघात राजकीय जोर वाढला असून या ठिकाणी असलेल्या विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना पाडण्यासाठी गुरुच्या नातवानेच आता शिष्यविरोधात शड्डू ठोकला असून विद्यमान मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांची श्रावण बाळाची कावड आता जनताच उतरणार आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांचे पूत्र वीरेंद्र मंडलिक यांनी आव्हान दिल्याने हसन मुश्रीफ यांची या मतदार संघात डोकेदुखी वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून, सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी, विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून शितयुध्द सुरू आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीतील फूट चव्हाट्यावर आली आहे. या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकली आहे. तर महायुतीत असलेले माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी आता विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तेंव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार पाडण्यासाठी त्यांचा मोठा हात होता, असा आरोप करीत या ठिकाणची उमेदवारी शिवसेनेला मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली असल्याचे विरेंद्र मंडलिक यांनी सांगितले आहे.
मंडलिक विरुद्ध मुश्रीफ वाद उफाळला
दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या बोटाला धरून राजकारणात आलेले हसन मुश्रीफ यांनी मंडलिक घराण्याशी काडीमोड घेऊन आपलं राजकीय वलय या मतदारसंघात निर्माण केले होते. त्यामुळे मंडलिक विरुद्ध मुश्रीफ वाद कित्येक वर्ष सुरू होता. आता पुन्हा हा वाद उफाळला असून हसन मुश्रीफ यांना राेखण्यासाठी घाटगे यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कागलमध्ये निर्णायक ताकद
दिवंगत खासदार सदाशिव मंडलिक यांनी मुश्रीफ यांना आमदार केलं, दोन वेळा मंत्री केलं तरी त्यांच्याच नातवाला विरोध करणाऱ्या मुश्रीफ यांच्या विरोधात परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अॅड. मंडलिक यांनी केली आहे. कागल मतदारसंघांमध्ये मंडलिक गटाची निर्णायक ताकद असल्याचे लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून आले आहे.
मुख्यमंत्री समजूत काढणार का?
राज्याचे मंत्री असले तरी मतदारसंघातील जनता मुश्रीफ यांना आमदार करण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळं त्यांनी आता थांबावं. महायुतीची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मला मिळावी, अशी मागणी वीरेंद्र मंडलिक यांनी केली आहे. मंडलिक गटाच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय मंडलिक यांची काय समजूत काढणार? की मंडलिक गट वेगळा निर्णय घेणार? याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.