अक्षय फाटक, पुणे : राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणून मुंबई व पुण्याकडे पाहिले जाते. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई आणि देशातले शिक्षणाचं माहेरघर पुण्याला समजलं जातं. मायानगरी असलेल्या मुंबईत सर्व काही मिळत तसंच आता पुण्यातही अलीकडच्या काळात सर्व काही मिळू लागले आहे. त्यासोबतच देशभरात मुंबई पोलिसांच्या नावाचा डंका आहे. अगदी तसाच डंका गेल्या काही वर्षांत ‘पुणे पोलिसांचा’ही पाहायला मिळत आहे. प्रत्येक आघाडीवर पुणे पोलीस ‘दोन पाऊल’ पुढे असल्याचे दिसत आहे. मग, तो गुन्ह्यात असो किंवा गुन्हेगारीला लगाम लावण्यात असो.
पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख….
पुण्याचा विस्तार पेठेंमधून उपनगरांपर्यंत गेला आहे. लोकसंख्याही १ कोटींच्या घरात आहे. शांतताप्रिय व शिक्षणाचे माहेर घर म्हणून नावलौकिक मिळविणारे पुणे आता आयटी हब व कॉस्मोपॉलिटन शहर बनलं आहे. तसा, गुन्हेगारीचा इतिहास देखील तितकाच झपाट्याने वाढत आहे. किरकोळ हाणामारी ते टोळीयुद्ध असा गुन्हेगारीचा आलेख असताना पुण्यातून देशात ड्रग्जच्या माध्यमातून गुन्हेगारीचे पाय रोवत असलेले गुन्हेगार वास्तव्य करत असल्याचे दिसत आहे. भयावह चित्र म्हणजे, देशासह जगाने दखल घ्यावी, इतपर्यंत ही गुन्हेगारी गेली आहे.
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने सर्वत्र कौतुक
पुणे पोलिसांनी देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज कारवाई केली. १६७० किलो एमडी हा ड्रग्ज पकडला. तो ‘उच्चदर्जा’चाही असल्याचे समोर आले. आतापर्यंत देशात असा ड्रग्ज बाहेरूनच येतो, असे मानले जात होते. पण, तो आता भारतातही तयार होत असल्याचे यामुळे उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी याकारवाईतून दोन पाऊल पुढे टाकत त्याची पाळेमुळे उघड केली. या रॅकेटचा मास्टरमाईंड तीन दिवसांत शोधत तो इंग्लडवासीय असल्याचे समोर आणले. तो देशातील ड्रग्जमधील मोठा मासा असल्याचेही तपासातून उघड होत आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात हात असलेली गुन्हेगारी केली उघड
पुणे पोलीस गेल्या काही वर्षांत सातत्याने ‘दोन पाऊल’ पुढे टाकत देशाच्या कानाकोपऱ्यात हात असलेली गुन्हेगारी उघड करत आहेत. मोस्टवॉन्टेड दहशतवादी पकडणे असो किंवा
उपचाराच्या निमित्ताने ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविणारा ललित पाटील, त्यापुर्वी टीईटी व म्हाडा परिक्षा घोटाळा, बीटकॉईन घोटाळा त्यासोबतच आयपीएलमधील बड्डे बुक्की व काही वर्षांपुर्वी कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला अशा अनेक महत्वाच्या घटनांतून पुणे पोलिसांनी चुनक दाखवत या गुन्ह्यांची पाळेमुळे खोदून काढली आहेत.
आयपीएस अधिकाऱ्यासह सायबत तज्ज्ञाला बेड्या
पुणे पोलिसांनी शिक्षक पात्रता भरती (टीईटी) आरोग्य भरती, म्हाडा परिक्षेचा पेपरफुटीप्रकरण उजेडात आणत महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्तांसह इतरांना बेड्या ठोकल्या. लष्करातील शिपाई पदाची भरतीप्रकरणातील गैरप्रकारही उघड केला. त्यासोबतच परिक्षा घेण्यासाठी शासनाने नेमलेल्या संस्थेचाही यात हात असल्याचे तपासातून उघड केले होते. तर, बीटकाईन घोटाळा उघड करत माजी आयपीएस अधिकाऱ्यासह सायबत तज्ज्ञाला बेड्या ठोकल्याची प्रकरणं उघड केली.
एनआयएकडून पुणे पोलिसांचे कौतुक
राज्यभरात पुणे पोलीस गाजत असतानाच देशातील तपास यंत्रणा दीड वर्षांपासून शोध घेत असलेल्या मोस्टवॉन्टेड दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी पकडले. त्यामुळे देशातील संभाव्य दहशतवादी कारवायांना ब्रेक तर लागलाच, परंतु, एक मोठी साखळीही उघड करण्यात एनआयएला यश आले. त्याबद्दल एनआयएने पुणे पोलिसांचे कौतुक करत अभिनंदनही केले. लागलीच गुन्हे शाखेने ललित पाटीलप्रकरण उजेडात आणले. यामुळेही राज्यभरात खळबळ उडाली.
पुणे पोलिसांकडून मोठे रॅकेट जेरबंद करीत टोळीवर मोक्का
मुंबई पोलिसांना ललित पाटीलच्या साखळीतील एक आरोपी मिळाला होता. त्याचा तपास सुरू होता. पण, त्यापुर्वीच पुणे पोलिसांनी दोन कोटी १४ लाखांचे एमडी ड्रग्ज पकडत ललित पाटीलचा चेहरा समोर आणला. यानंतर मुंबई पोलिसांनी घाई गडबडीत नाशिक येथील त्याच्या कारखान्यावर छापेमारी केली. परंतु, पुणे पोलिसांनी एका कारवाईवरून मोठे रॅकेट जेरबंद करत टोळीवर मोक्का कारवाई केली.
देशात बँकेच्या सर्व्हरवर झालेला पहिला हल्ला
त्यापुर्वी बीटकॉईनप्रकरणात देशातील पहिला गुन्हा पुण्यातच दाखल करत तो तपास पुणे पोलिसांनी पुर्णकरत मुख्यआरोपी उघड केले. तसेच, देशात बँकेच्या सर्व्हरवर झालेला पहिला हल्ला पुण्यात घडला होता. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हा हल्ला झाला होता. त्यातील प्रमुख आरोपीपर्यंत पोलीस पोहचले होते. ९४ कोटी रुपये लंपास केले होते. त्यातील काही रक्कम पोलिसांनी परत मिळविण्यात यश आले.
पुणे पोलीस दोन पाऊल पुढे
देशात गाजतील अशा कारवायांसोबतच पुणे पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात मोक्का आणि एमपीडीएची सर्वाधिक कारवाई देखील केली. गेल्या तीन ते साडे तीन वर्षात पुण्यातील गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी तब्बल सव्वा दोनशे टोळ्यांवर मोक्का कारवाई केली. तर, दीडशेहून अधिक गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. एकूण गुन्हेगारांच्या मनात भय बसविण्यासोबतच पुणे पोलीस चाणक्य कारवाईत आता दोन पाऊल पुढे टाकत असल्याचे दिसत आहे.