बंजारा समाज उतरला रस्त्यावर (फोटो : सोशल मीडिया)
वाशिम : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी समाजातील लोकांद्वारे तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. आदिम लक्षणे असलेल्या मात्र राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारसी त्वरेने लागू करून, अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय सहन करत असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी बुधवारी हजारो बंजारा समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग महाराज यांच्यासह महाराज परिवारातील जवळपास सर्व सदस्य, वीज मंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड, रमेश महाराज, संजय महाराज यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा समाजातील सर्व पक्षातील पुढारी, चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, शहर व प्रत्येक तांड्यातील जागरूक नागरिक व तरुणांनी मोठ्या संख्येत आरक्षण मागणीच्या आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवला.
बंजारा समाजाला आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावे, यासंबंधीचे निवेदन तहसीलदार मानोरा यांच्यामार्फत राज्याच्या शासन प्रमुखांना देण्यात आले. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
संघर्षाचा आदर होणार; आमदारांची भावना
सामाजिकदृष्ट्या अतिशय मागासलेल्या व नियम व निकषात बसत असल्यामुळे राज्यातील बंजारा समुदायाला राज्य शासनाकडून निश्चितच कुणाही अन्य मागासवर्गीय समाजावर अन्याय न करता, आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलली जातील व बंजारा समाजातील ज्या लोकांनी हे आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष केले आहे. त्यांच्या संघर्षाचा आदर राज्य शासन नक्कीच करेल, असा विश्वास या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदारांनी व्यक्त केला.