फोटो सौजन्य - Social Media
पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसर ते शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी गंभीर बनली आहे. या सततच्या कोंडीमुळे रिक्षा चालक त्रस्त झाले असून, डोंबिवली शहर रिक्षा चालक-मालक संघटनेने शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर आपली मागणी मांडली. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चोपडे यांच्या विनंतीला मान देत रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ सहाय्यक आयुक्त आणि ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांची भेट घेण्यासाठी गेले. त्या वेळी वाहतूक पोलिस अधिकारी झोपे, घोलप, कदम आदी अधिकारी उपस्थित होते. रिक्षा युनियनच्या वतीने अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, उदय शेट्टी, विश्वंभर दुबे, राजेंद्र गुप्ता, कैलास यादव, अनिल मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या चर्चेत शिष्टमंडळाने फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी, रिक्षा उभ्या करण्याच्या जागेची अडचण, आणि प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींचा मुद्दा मांडला. चर्चेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पालिकेच्या निर्णयानुसार, येत्या सोमवारपासून पुढील पंधरा दिवसांच्या आत गुप्ते रोड आणि इतर प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाल्यांना पट्टे मारून ठराविक जागेत बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर रस्ते फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी नियमित कारवाई करण्याचेही आश्वासन देण्यात आले. मात्र, रिक्षा संघटनेने इशारा दिला की, जर पंधरा दिवसांत काहीच कृती झाली नाही आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहिला, तर पालिकेच्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन केले जाईल. त्यावेळी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.
या चर्चेमुळे सध्या रिक्षा चालकांमध्ये समाधान दिसत असले तरी पुढील पंधरा दिवसांत पालिका ठोस पावले उचलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






