साथी सुजाता भोंगाडे यांना 'बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार' जाहीर
केशव गोरे स्मारक ट्रस्ट मार्फत दिला जाणारा बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार साथी सुजाता भोंगाडे यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबुराव (प. बा.) सामंत यांच्या स्मृतीला सलाम करण्यासाठी केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे महाराष्ट्रातील कार्यकर्त्याला बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
२०१० सालापासून दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी नागपूर जिल्ह्यात असंघटित कामगार, घरेलू कामगार यांना संघटित करणाऱ्या, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या साथी सुजाता भोंगाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख पन्नास हजार रुपये, मानपत्र आणिमानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सुजाता या विदर्भामधील एक धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. विदर्भात गोसीखुर्द धरणामुळे जवळपास १०० गावातील विस्थापित होणाऱ्या लोकांचे संघटन त्यांनी बांधले. हा लढा सातत्याने २० वर्षे चालविला. त्यासाठी न्यायलयीन लढत दिली आणि अखेर १८,००० विस्थापितांना न्याय मिळवून दिला.
नागपूर येथील घरेलू कामगार, स्वयंपाक करणाऱ्या,वृद्धांची सेवा करणाऱ्या,अगरबत्ती करून विकणाऱ्या अशा छोटेमोठे काम करणाऱ्या कामगारांचे संघटन बांधले.त्यांच्या मध्ये जाणीवजागृती केली आणि त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचे बळ दिले. घरेलू कामगारांसोबत १५ राज्यात काम करणाऱ्या संघटनांना एकत्र करून त्यांची समन्वय समिती स्थापन केली. या समितीच्या कामामुळे २००८ मध्ये घरेलू कामगारांविषयीचा कायदा मंजूर झाला आणि त्यातूनच घरेलू कामगार मंडळ निर्माण झाले.कोरोना काळात या मंडळाच्या वतीने घरेलू कामगारांना मदत मिळवून देण्यात सुजाता यांचा मोलाचा सहभाग होता. वस्ती पातळीवर महिलांचे ४००च्या वर बचतगट स्थापन केले. या बचतगटात व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन, स्त्री पुरुष समानता कार्यशाळा आयोजित केल्या जातात.त्यांनी बांधकाम कामगारांचे अभ्यास मंडळ, बालमजूर निर्मूलनासाठी वस्तीपातळीवर अनौपचारिक शिक्षण वर्ग सुरु केले. जवळपास ५०० बालमजुरांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
सुजाता या विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष आहेत. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील घरेलू कामगारांना संघटित करून त्यांची नोंदणी करून घेणे, त्यांच्या मध्ये जाणीव जागृती करणे,त्यांच्यातील क्षमता विकसित करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. घरेलू कामगार ज्या कुटुंबात काम करत आहेत त्या कुटुंबातील व्यक्तींसोबत संवाद साधून घरेलू कामगार आणि ते कुटुंब यांच्या परस्परांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याचे प्रयत्न त्या करत आहेत. या घरेलु कामगारांच्या मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करतात. कोरोना काळात त्यांनी एकल महिलांना संघटित केले होते त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले होते. आजही त्यांचे एकल महिलांसोबत काम सुरु आहे. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ त्या कार्यरत आहेत.
सार्वजनिक संसाधनांचा उपयोग तळागाळातील लोकांसाठी झाला पाहिजे असा आग्रह धरणारे, घटनेच्याचौकटीत राहूनकायद्याचे अस्त्र लोकांच्या हितासाठी वापरणारे, ‘जनहित याचिका’ हा शब्दप्रयोग प्रचलितकरणारे, बॅ. ए. आर. अंतुले यांच्या सिमेंट भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयीन लढा देणारे, सर्वसामान्यांच्या निवारा हक्कासाठी लोक सहभागातून संघर्षकरत नागरी निवारा वसाहत उभारणारेबाबुराव (प.बा.) सामंत यांच्या स्मृती जागवण्यासाठी दिला जाणारा पुरस्कार साथी सुजाता भोंगाडे यांना दिला जात आहे. समाजवादी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आणि अभ्यासक केशव ऊर्फ बंडु गोरे यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्थापनझालेल्या केशव गोरे स्मारक ट्रस्टने २०१० पासून हा पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. हे पुरस्काराचे १६ वेवर्ष आहे.रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गोरेगावमधील आरे रोड अ . भि . गोरेगावकर इंग्लिश स्कूलचे खुले सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला.






