अशोक खरात यांचे शिर्डी-राहता कनेक्शन; तब्बल 2000 कोटींच्या संपत्तीचा अंदाज
या भोंदूबाबाच्या जाळ्यांची मूळ शिर्डी आणि राहाता तालुक्यात घट्ट रोवलेली असल्याचे समोर येत आहे. विशेषतः शिडीं, साकुरी आणि काकडी विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिन खरेदी, आलिशान हॉटेल्स, तसेच कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार उभे करून एक प्रचंड साम्राज्य उभारल्याचे उघड होत आहे. श्रद्धेच्या नावाखाली उभारलेले हे आर्थिक जाळे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Ahilyanagar News: ‘ती’ एक चूक आणि संगमनेर पोलीस ठाण्यात शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, बाबाच्या नावावर तब्बल दोन हजार कोटींपेक्षा अधिक चल-अचल संपत्ती असल्याचा अंदाज आहे. विविध शहरांमध्ये जमीन, फ्लॅट्स, हॉटेल्स आणि गुंतवणुकीचे जाळे उभे आहे.
या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली ती ५ मार्च रोजी जेव्हा कॅप्टन बाबाच्या एका निकटवर्तीय कर्मचाऱ्याने अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे एक पेनड्राईव्ह सुपूर्द केला. या पेनड्राईव्हमधील माहितीने तपास यंत्रणेला हादरवून सोडले.
घार्गे यांनी तातडीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती देत प्रकरणाचे गांभिर्य अधोरेखित केले. फडणवीस यांनी संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर तपासाला वेग आला. डिसेंबर 2024 पासूनच या प्रकरणाची बीजे रोवली गेली होती.
संबंधित कर्मचाऱ्याने गुप्त कॅमेऱ्याच्या साहाय्याने जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत अनेक धक्कादायक व्हिडिओ रेकॉर्ड केले. या व्हिडिओमध्ये महिलांशी गैरवर्तन, अंधश्रद्धेच्या नावाखालील अमानवी कृत्ये आणि विकृत प्रकार दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
संतापजनक बाब म्हणजे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये घृणास्पद प्रकारांचा समावेश असल्याचे आरोप आहेत. श्रद्धाळूच्या भावनांचा गैरफायदा घेत मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे समोर येत आहे. घृणास्पद प्रकार उघडकीस आणणाऱ्या त्यांच्याच एका कर्मचाऱ्याला एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याचा आरोप आहे.
अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहे? नेमके किती मोठे जाळे आहे? कोणकोण यात सामील आहे ? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पीडितांना न्याय मिळणार का? ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून अंधश्रद्धा, भीती आणि आंधळ्या भक्तीच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या व्यवस्थेचा भयानक चेहरा उघड करते.
शिर्डी येथे दाखल तक्रारीनंतर तपासाने वेग घेतला. पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मूळ प्रकरणाचा सखोल छडा लावला. शिर्डी-राहाता परिसरात खोलवर पसरलेले हे आर्थिक आणि सामाजिक जाळे आता उखडून काढणे हीच खरी कसोटी ठरणार आहे. आता निष्पक्ष, कठोर आणि पारदर्शक तपासाची गरज आहे. एका ‘बाबा’चा नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा हा मुद्दा आहे.






