अहमदाबाद विमान अपघात तांत्रिक चुकी की सायबर हल्ला…; संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut News: अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या ड्रीमलाइनर विमान अपघातावरून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “हा अपघात केवळ तांत्रिक चुकांमुळे झाला की यामागे सायबर हल्ल्याचा कट होता?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारकडून गंभीर आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली.
राऊत म्हणाले, “ड्रीमलाइनर अपघाताची चौकशी सध्या देश-विदेशातील एजन्सींकडून सुरू आहे. एकाच वेळी दोन इंजिन बंद पडणे, हे अत्यंत गंभीर आहे. हे सायबर हल्ला होता का? शत्रू राष्ट्रांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला का? हे प्रश्न एजन्सी तपासत आहेत.” त्यांनी सिव्हिल एव्हिएशन विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये (ATC) आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचारी आहेत. अहमदाबाद एअरपोर्टवर विमानांचे मेंटेनन्स कोणाच्या ताब्यात आहे, हे अजूनही स्पष्ट नाही. प्रवाशांच्या मनात त्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत,” असेही राऊत यांनी स्पष्टं केलं.
संजय राऊतांनी एअर इंडिया खाजगीकरणावरून केंद्र सरकारवर त्यांनी टीकास्त्र डागलं. “केवळ खाजगीकरण करून जबाबदाऱ्या झटकता येत नाहीत. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाकडून एअर इंडियाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडत आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
“अपघात की हल्ला? – पहलगाम हल्ल्याची आठवण”
राऊत म्हणाले, “या अपघातात विमान एका मेडिकल इमारतीवर कोसळले. निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. हे सहज विसरणे शक्य नाही. पहलगाममध्ये घडलेल्या हल्ल्यासारखी ही घटना आहे. त्यामुळे हा अपघात नव्हे तर नियोजित हल्ला होता का, याचा तपास होणे गरजेचे आहे.”
त्यांनी अपघातानंतर सरकारच्या प्रतिक्रिया व कृतीवर नाराजी व्यक्त केली. “मंत्री मृत्यूच्या ढिगाऱ्यावर उभे राहून रील बनवत होते. कुणाच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नव्हतं. सरकारला मोठा धक्का बसल्याचे कुठेही जाणवत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
SA vs AUS : WTC फायनलमध्ये एडन मार्करमसमोर स्टार्क – हेजलवूड – कमिन्स फेल, खेळाडूंने ठोकले शतक
“भाजप मराठी माणसाचा शत्रू” – राज-फडणवीस भेटीवर संतप्त प्रतिक्रिया
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील भेटीवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “फडणवीस हे गौतम अदानी आणि बिल्डर्सचे समर्थक आहेत. त्यांचा आणि भाजपाचा मराठी माणसाशी काहीही संबंध नाही. ते मराठी माणसाचे शत्रू आहेत, हे जनतेने ठरवलं आहे.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “मराठी माणसाचा एकत्रीकरण हाच आमचा हेतू आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे – परप्रांतीय मुंबई गिळत असतील आणि भाजपा व शिंदे गट आर्थिक लोभापोटी मदत करत असतील, तर महाराष्ट्र स्वाभिमानाने एकत्र यायला हवा.”
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – शिवसेना स्थानिक पातळीवरच निर्णय घेणार
स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राऊत म्हणाले, “यावर धोरणात्मक निर्णय घेणे अनेकदा शक्य होत नाही. शिवसेना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निवडणूक लढवण्याबाबत भूमिका ठरवेल.”