नागपुरात शेकडो कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Nagpur Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. राज्यभरात भाजपमध्य़े प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या-पदाधिकाऱ्यांच्या रागां लागल्या आहेत. पण दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात मात्र काही वेगळाच प्रकार समोर आला आहे. नागपुरातील काटोल भागातील काही कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल आहे.
या वेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘तुतारी’ हाती घेत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली नव्याने काम करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण स्पष्ट करताना सलील देशमुख म्हणाले, “भाजपमध्ये बाहेरच्यांना पायघड्या अंथरल्या जातात, पण निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लावल्या जातात. पक्षाच्या या धोरणामुळे अनेकांची मने दुखावली जात आहेत.”
काटोल विधानसभा मतदारसंघातील सावरगाव सर्कल बानोर पिठारी येथील उपसरपंच शेखर पांडे, नीलेश पांडे, निखील चौधरी यांच्यासह भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश केलेला आहे.
या कार्यकर्त्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, “काटोल व नरखेड तालुक्यात भाजपमध्ये आयारामांना संधी मिळते, तर वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे पक्षातील नाराजी वाढत असून, आगामी काळात शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील,” असा दावा त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभांमध्ये भाजप नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर हे आश्वासन केवळ जाहीर भाषणापुरतेच राहिले असून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. “लाडकी बहीण” या अभियानाच्या भरवशावर सत्ता मिळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता त्याच बहिणींना सापत्न वागणूक दिली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. अनेक लाभार्थी महिलांची नावे योजनांच्या यादीतून कारणाशिवाय वगळली जात असून, खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहचण्यात अडथळे येत आहेत.
काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुख रिंगणात उतरले होते. त्यांना भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांनी पराभूत केले.
हा पराभव देशमुख कुटुंबाला चांगलाच जिव्हारी लागला असून, निवडणूक निकालाविरोधात सलील देशमुख यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी निकालाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली आहे. विशेष म्हणजे, या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात नवा रंग भरला असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.