संग्रहित फोटो
पुण्यातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने असे मत व्यक्त केले की, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रावर चांगली पकड बसली आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपकडे इच्छुकांची गर्दी जास्त आहे. अशा राजकीय परिस्थितीत अजित पवार यांनी नगरपालिका निवडणुका, महापालिका निवडणुका यामध्ये भाजप विरोधात जाणे हे त्यांना मारक ठरू शकते.
काही राजकीय अभ्यासकांच्या मते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लावलेल्या सापळ्यात अजित पवार पूर्ण अडकले आहेत. स्थानिक पातळीवर कोणाशीही युती आघाडी करण्याची मुभा शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. ती मुभा मिळताच अजित पवार यांचेच समर्थक शरद पवारांच्या पक्षाशी युती करताना दिसले. अजित पवारांनीही त्यांना रोखले नाही. किंबहुना पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याला अनुकूलता दर्शविली. पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशा हालचाली सुरू झाल्या. यात शरद पवारांचे नुकसान काहीच नाही. मात्र, भाजपचे तळातील कार्यकर्ते सुद्धा अजित पवारांच्या बाबतीत संशयाने बघू लागले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि अजित पवार यांच्यातील दरी वाढेल, अशी शक्यता दिसू लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना महायुतीत घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा दिला. त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रीपदे दिली. ही बाब भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना रुचली नव्हती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे बेरजेचे राजकारण असावे, असे समजून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मौन पाळले. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श असून, शाहू, फुले, आंबेडकर यांची वैचारिक परंपरा आम्ही मानतो, अशी राजकीय भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली. त्यावर भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं की, अजित पवार यांच्या बरोबर आमची वैचारिक युती नसून, ती एक राजकीय तडजोड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भेटीचे निमंत्रणही अजित पवार यांनी टाळले. याचा परिणाम म्हणजे अजित पवार आणि भाजप यांचे राजकीय मनोमिलन झालेलेच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केलं आणि भाजप एकसंधपणे लढला. भाजपच्या मतदारांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना मतदान केले, पण, तो विशिष्ट परिस्थितीतील अपवाद म्हणावा लागेल.
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक येथील महापालिकेतील सत्तेला आगामी काळात महत्त्व आहे. मुंबईत भाजपनेच अजित पवार यांना दूर केलं आहे. पुण्यातही मैत्रीपूर्ण लढत असा गोड शब्द वापरून फडणवीस यांनी अजित पवार यांची राजकीय बोळवण केलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत तेथील भाजपचे आमदार जोरदारपणे लढत देऊन भाजपचेच बहुमत आणू पहात आहेत. तिथे अजित पवार यांना भाजपशी जोरदार लढा द्यावा लागणार आहे. ठाणे आणि नाशिक येथे अजित पवार यांच्या पक्षाचा फारसा बेस नाही. हे सगळं पाहिल्यावर अजित पवार काय साधू पहात आहेत? याचे नेमके उत्तर सापडत नाही.






