Ajit Pawar Funeral: ...तर अपघात टळला असता; धावपट्टीवर अंधार आणि तांत्रिक मर्यादा
Ajit Pawar Funeral : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज (२९ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील व राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काल सकाळपासूनच बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा आणि चाहत्यांचा अलोट जनसागर लोटला असून, संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्राथमिक अहवालानुसार, बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. अशातच, ‘लँडिंग’चा घेतलेला निर्णय किंवा तांत्रिक बिघाड यापैकी एक चूक महागात पडल्याची चर्चा सध्या राजकीय आणि तांत्रिक वर्तुळात रंगली आहे. विमानतळ प्राधिकरणाने (AAIB) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, ‘ब्लॅक बॉक्स’च्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.
बारामती विमानतळावरील अपघातानंतर आता तेथील तांत्रिक सोयीसुविधांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दुर्घटनेमागे विमानतळावरील काही त्रुटी कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘अनियंत्रित’ विमानतळ आणि तांत्रिक मर्यादा: बारामती विमानतळ हे प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ‘अनियंत्रित’ (Uncontrolled) विमानतळ आहे. येथे मोठ्या व्यावसायिक विमानांसाठी लागणारी ‘शेड्युल विमानसेवा’ उपलब्ध नसल्याने, अद्ययावत तांत्रिक सुविधांची कमतरता आहे.
नाईट लँडिंग आणि लाइट्सचा अभाव: या विमानतळावर रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात विमान उतरवण्यासाठी आवश्यक असणारी ‘नाईट लँडिंग’ (Night Landing) सुविधा उपलब्ध नाही. धावपट्टीवर पुरेसे दिवे (Runway Lights) नसल्यामुळे कमी दृश्यमानतेच्या (Low Visibility) परिस्थितीत वैमानिकाला अचूक अंदाज घेण्यास अडथळे येतात.
नेव्हिगेशनल एड्सची कमतरता: तज्ज्ञांच्या मते, जर येथे ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) किंवा ‘प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ (PAPI) सारख्या सुविधा असत्या, तर वैमानिकाला धावपट्टीचे नेमके स्थान आणि विमानाची उंची समजण्यास मदत झाली असती.






