फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्यामुळे लोकसभेमध्ये विपरित परिणाम झाल्याचा दावा भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसने केला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी व शिंदे गटाचे रामदास कदम यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
रामदास कदम यांनी अजित पवार यांना शिवसेनेच्या वर्धापन सोहळ्यामध्ये टोला लगावला होता. तुफान राजकीय फटकेबाजी करत रामदास कदम यांनी भाषण केले. रामदास कदम म्हणाले, शिंदे गटाच्या उमेदवारांची घोषणा वेळेत झाली असती तर आज चित्र वेगळं असतं.माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती, माझा हेमंत पाटील दिल्लीत गेला असता, माझा नाशिकचा हेमंत गोडसे दिल्लीत गेला असता. मागून आलेले अजितदादा जरा उशीरा आले असते तर बरं झालं असतं. असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार गट व शिंदे गटामध्ये सारे काही अलबेल नसल्याचे दिसून आले आहे.
अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर
अजित पवार यांच्यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी खुरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्य माध्यमातून शिंदे गटाचा समाचार घेतला आहे. एका ट्वीटमध्ये अमोल मिटकरी यांनी लिहिले आहे की, रामदास कदमजी आपण जोरात बोललात “मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं” माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका…” असा घणाघात अमोल मिटकरी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून केला.
रामदास कदमजी आपण जोरात बोललात
“मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं”
माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं
दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका.. — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 20, 2024