सौजन्य - नवराष्ट्र टीम
तासगाव/ मिलिंद पोळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याच्या उंबरठ्यावर तासगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा उलथापालथीच्या टप्प्यावर आली आहेत. भाजपपासून दूर झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी नव्या राजकीय दिशेचा शोध सुरू केला आहे, तर विद्यमान आमदार रोहित पाटील यांनी आपल्या संघटनात्मक ताकदीवर आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजप नव्याने संघटन करुन तयारीला लागली आहे. त्यामुळे तासगाव नगरपरिषदेची निवडणूक ही सत्तेसाठीची लढत न राहता प्रतिष्ठेची झुंज ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
२०१६ मध्ये झालेल्या तासगाव नगरपरिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता काबीज केली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार सुमन पाटील यांच्या गटाचा पराभव झाला होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने तासगावातील राजकारणाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. या निवडणुकीत संजय पाटील यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली होती, मात्र अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी अनपेक्षितरीत्या त्यांचा पराभव केला. हा धक्का भाजप आणि संजय पाटील या दोघांसाठीही राजकीयदृष्ट्या गंभीर ठरला.
लोकसभेच्या पराभवानंतर संजय पाटील यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून विधानसभेची उमेदवारी घेतली. मात्र, लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही त्यांना सलग पराभव पत्करावा लागला आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या हातून त्यांचा पराभव झाला. या दुहेरी धक्क्यानंतर काही काळ संजय पाटील विजनवासात गेले होते. परंतु अलीकडेच तासगावात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा राजकारण व समाजकारणात सक्रिय होण्याची घोषणा करत, “भाजप वा राष्ट्रवादी (अजित पवार गट) या कोणत्याही पक्षासोबत राहणार नाही,” असे जाहीरपणे सांगून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली. त्यानंतर अवकाळी ग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनात भाजपच्या नेतृत्वावर केलेल्या सडेतोड टीकेने त्यांच्या नव्या राजकीय अवताराची झलक दिली.
सध्या तालुक्यातील राजकीय पट शांत दिसत असला तरी या शांततेखाली उकळणारे समीकरण आगामी निवडणुकीत मोठे वादळ घडवू शकते. संजय पाटील यांच्या पुनरागमनाची छाया, रोहित पाटील यांच्या संघटनात्मक पकडीविरोधातील आव्हान, काँग्रेसमधील गोंधळ, आणि भाजपचा अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न या त्रिकोणातून तासगावची लढत यंदा ‘सत्तेची नव्हे तर अस्तित्वाची परीक्षा’ ठरणार आहे.
तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तासगाव बाजार समिती निवडणूक तसेच त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत प्रत्यक्ष न राहता, अंतर्गतपणे माजी खासदार संजय पाटील यांना मदत केली होती, अशी चर्चा आहे. आता नगरपरिषदेच्या तयारीला लागल्याचे चित्र असून, त्यांनी संपर्क वाढवला आहे. तासगावचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने, महादेव पाटील यांच्या गोटातून कोणाचे नाव पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे तासगावच्या राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची कुजबुज सुरू झाली आहे.
तासगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजपकडून तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्निल पाटील आणि राज्य किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्ढे पाटील सक्रिय असून, माजी नगराध्यक्ष दिनकर धाबुगडे यांच्या स्नुषा विद्या धाबुगडे यांचे नावही चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील, माजी नगरसेविका निर्मला पाटील आणि माजी नगराध्यक्ष एम. पी. पवार यांच्या स्नुषा स्नेहल पवार आघाडीवर आहेत. तर माजी खासदार संजय पाटील गटाकडून विजया पाटील आणि दिपाली पाटील यांची नावे चर्चेत आहेत. नगराध्यक्षपदाची लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
“स्थानिक पातळीवर आम्हाला सन्माननीय जागा देणाऱ्यांसोबतच निवडणुकीत उतरणार,” अशी भूमिका जाहीर करणारे काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील पुन्हा चर्चेत आहेत. तासगाव बाजार समितीपासून लोकसभा-विधानसभा निवडणुकांपर्यंत त्यांचा माजी खासदार संजय पाटील यांच्याकडचा कल लक्षात घेता, आता ते पुन्हा त्यांच्यासोबतच जाणार का, यावर तासगावात चर्चेचा धुरळा उडाला आहे.






