अक्कलकोट : अक्कलकोटमध्ये सोमवारी (दि.५) आंबेडकरी जनतेचा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी विशाल असा जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. आंबेडकरी समाजासह बहुजन समाजातील जवळपास २५ हजाराहून अधिक महिला, नागरिक, अबालवृद्ध या जन आक्रोश महामोर्चात सहभागी झाले होते. हा जन आक्रोश महामोर्चा अक्कलकोट शहरातील भीमनगर येथून दुपारी १२.३० वाजता सुरू झाला. हा जन आक्रोश महामोर्चा राजे फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार पेठ, कारंजा चौक, विजय कामगार चौक, बस स्थानक मार्गे एवन चौकापर्यंत जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
शहर व ग्रामीण भागातील मागासवर्गीय बांधवांवर मोठ्या प्रमाणात होत असलेला अन्याय अत्याचार, जातीयवाद, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो त्यांच्याच पुतळ्याची गुलबर्गा येथे विटंबना करण्यात आली होती. तसेच अक्कलकोट तालुक्यातील बाणजगोळ, घोळसगाव, हालहळळी यासह विविध गावात मागासवर्गीय जनतेवर मोठया प्रमाणात अन्याय वाढला आहे. या अत्याचाराविरुद्ध व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचा समारोप एवं चौकातील एवं चौक येथे जाहीर सभेमध्ये करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते माजी नगरसेवक उत्तम गायकवाड आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अमर शिरसाठ, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विकी बाबा चौधरी, बसपाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल अरेनवरू, अजय मुकणार, संदीप मडीखांबे, शिलामणी बनसोडे, जेष्ठ नेते चंद्रकांत इंगळे, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, छात्र भारती संघटनेचे सचिन बनसोडे, तुकाराम दुपारगुडे, पुण्याचे रामभाऊ सोनकांबळे, राहुल रूही, सागर सोनकांबळे, बाबूराव बनसोडे, यशवंत नडगम आदींसह विविध नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली.
यावेळी उत्तम गायकवाड, अविनाश मडीखांबे, चंद्रशेखर मडीखांबे, विठ्ठल आरेनवरू, अजय मुकणात, विकीबाबा चौधरी, सागर सोनकांबळे, सुहानी मडीखांबे आदीनी मार्गदर्शन केले. यावेळी कर्नाटकातील गुलबर्गा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी द्या. तसेच अक्कलकोट शहर व तालुक्यात वाढत असलेल्या जातीवादी प्रवृत्तींना वेळीच आवर घाला. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सर्वच उपस्थित नेतेमंडळींनी केली.