मुंबई: गेल्या चार दिवसांपासून कोकणात (Kokan Rain) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीही साचलं आहे. त्यामुळे काल रात्री रायगड जिल्ह्यातील (Raigad) पोलादपूर येथील आंबेनळी घाटात मोठी दरड (Ambenali Ghat Collapsed) कोसळली आहे. त्यामुळे रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली आहे. मात्र, आंबेनळी घाटात दरड कोसळल्यानंतर हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना ताम्हिणी घाटातून प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचं नुकसान झालं आहे. तुम्ही कोकणात जाणार असाल तर या मार्गाने जाणं टाळा.
आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद
पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कालिकामाता पॉइंटजवळ ही दरड कोसळली आहे. काल रात्री 11 वाजता आणि सकाळी 7 वाजता अशी दोन वेळा दरड कोसळली आहे. याच मार्गाने महाबळेश्वरकडे जाता येते. दरड कोसळल्यानंतर येथील रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ताम्हिणी घाटातून पर्यायी वाहतूक वळवण्यात आली आहे. या पर्यायी मार्गाचा किंवा इतर मार्गाचा प्रवाशांनी वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Maharashtra | Ambenali Ghat road is temporarily closed for traffic from both following recent incidents of rock-slide, say Raigad Police. pic.twitter.com/xawxVoRc6r
— ANI (@ANI) June 28, 2023
रत्नागिरी – गणपतीपुळे वाहतूक ठप्प, परशुराम घाटात घडतायत दरड कोसळण्याच्या घटना
दरम्यान, रत्नागिरीत धुवांधार पावसाची बँटींग सुरु झाली आहे. मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. पावसाचा फटका रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गाला बसला आहे. भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आलं आहे. दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
परशुराम घाटात किरकोळ दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. घाटातील एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण पुर्ण झाले असून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील घाटात एक-दोन दगड रस्त्यावर आले होते.चौपदरीकरणातील बहुतांशी कामे मार्गी लागल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात दरडीचा धोका जाणवू लागला आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसात दोनदा किरकोळ स्वरूपाच्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. शनिवारी महाड हद्दीत असलेल्या परशुराम घाटात डोंगरातील काही प्रमाणात दगड रस्त्यावर आले होते. मात्र त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही.
कणकवलीत महामार्गावरील ब्रिजवरून पडतंय पाणी
पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची दाणादाण उडाली आहे. कणकवलीत चक्क महामार्गामुळे सर्व्हिस रोडवर धबधबे वाहताना दिसून आले आहेत. कणकवली येथे महामार्गावर मोठा पूल बांधण्यात आला आहे. आता या ब्रिजच्या कामाबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यातच पहिल्या पावसाने या ब्रिजवरून अनेक धबधबे वाहताना दिसून आले आहेत. पुलावरुन दुधडी भरुन पाणी खाली पडताना दिसत आहे. ब्रिजवरुन पडणाऱ्या या पाण्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अजून पावसाने हवा तसा जोर धरलेला नसताना पहिल्याच पावसात महामार्गाची ही अवस्था आहे. त्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.