ठाकरे बंधूंची आज राज्यातील पहिली सभा (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची राज्यातील पहिलीच संयुक्त सभा नाशिक येथे आज (दि.९) होत आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या तोफा कोणावर धडाडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नाशिक हे दोन्ही ठाकरेंसाठी महत्वाचे शहर असून, शिवसेनेने १९९५ मध्ये नाशिकमधूनच विधानसभेचे रणशिंग फुंकून राज्यातील सत्ता मिळवली. त्यामुळे ही सभा सेना व मनसेसाठी निर्णायक ठरणार आहे. येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी ही सभा होत आहे. राज्यात शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरूवात नाशिकमधूनच झाली होती. त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र आल्याने ही सभा दोन्ही पक्षांसाठी महत्वपूर्ण मानली जात आहे. राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी संयुक्त सभा घेण्याचे ठरविले असून, त्याची सुरूवात नाशिकमधून होत आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष संयुक्तपणे लढत आहे. या सभेच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर तयारी केली जात असून, सभेच्या पूर्वसंध्येला दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रभागनिहाय दौरे करून कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या सभेसाठी सेना-मनसे कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह असून, सभा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याची माहिती उपनेते दत्ता गायकवाड यांनी दिली.
राज ठाकरे दुपारी दोनला येणार
मनसे प्रमुख राज ठाकरे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता विमानाने ओझर येथे येतील व तेथून ते थेट हॉटेल ताजमध्ये थांबतील. तर उद्धव ठाकरे हे दुपारी चार वाजता ओझर येथे येतील व ताजमध्ये रवाना होऊन दोन्ही नेते सभेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी सहा वाजता एकत्र जाहीर सभेसाठी येतील.
दोन्ही ठाकरेंसाठी नाशिक महत्वाचे
राज ठाकरे यांनी २००९ मध्ये नाशिकमध्ये जाहीर सभा घेऊन तीन आमदार निवडून आणले होते. त्यानंतर २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीसाठी शहरातील जाहीर सभांद्वारे रान उठवून पहिल्यांदाच मनसेचे ४४ नगरसेवक निवडून आणले होते.
1995 मध्ये घेतले होते राज्यस्तरीय अधिवेशन
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने १९९५ मध्ये राज्यस्तरीय अधिवेशन घेवून विधानसभेचे रणशिंग फुंकले होते. त्यावेळी जिल्ह्यातून शिवसेनेचे ७ आमदार निवडून आले होते. त्यानंतर प्रत्येक निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या सभा निर्णायक ठरल्या. अलिकडे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या सभेने शिवसेनेचे राजाभाऊ वाजे निवडून आले.
हेदेखील वाचा : Uddhav – Raj joint interview : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव..! राज-उद्धव ठाकरेंनी घेतला सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार






