मोहोळ : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ या गाळप हंगामात गाळपास आलेल्या उसाची पूर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली असून, दिवाळीच्या सणासाठी म्हणून ५० रुपये प्रति टनाप्रमाणे हप्ता व एकूण एफआरपी मिळून १०४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. ऊस उत्पादक सभासदांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी प्रति सभासद २५ किलो साखर व दहा हजार फराळांच्या बॉक्सचे वाटप तसेच कामगारांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ८.३३ टक्के बोनस वाटप करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांनी दिली.
उपाध्यक्ष सतीश जगताप म्हणाले, कारखाना प्रशासनाने चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली असून, ऊस तोडणी टोळ्या कारखाना कार्यस्थळावर दाखल होत आहेत. खासदार महाडिक हे दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्यांनी यापूर्वी दिलेली सर्व आश्वासने पाळली आहेत. चालू गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रति टन २ हजार १०० रुपयाप्रमाणे जाहीर केली आहे. त्यामुळे सभासदात आनंदाचे वातावरण आहे. शनिवार (दि.२२) ऑक्टोबरपासून सभासदांना साखर वाटपास कारखाना कार्यस्थळावर सुरुवात करण्यात आली आहे.