भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर (संग्रहित फोटोे)
नागपूर : राज्यात महापालिका निवडणुकीचे वातावरण आहे. सर्वच पक्षांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी तयारी केली जात आहे. त्यात नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २९ मधील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून काँग्रेस उमेदवाराला थेट आर्थिक प्रलोभन देण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र गजबे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून १० लाख रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याच्या काही महानगरपालिकांमध्येही भाजपने हा प्रयोग केला, तेथे त्यांचं जमलं. पण नागपुरात काँग्रेस उमेदवार त्यांच्या प्रलोभनाला बळी पडला नाही. त्यामुळे भाजपचा हा प्रयोग फसला, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
प्रभाग क्रमांक २९ मध्ये काँग्रेस आणि भाजप असे दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा अर्ज मागे घेतला गेला असता भाजपला ही निवडणूक बिनविरोध जिंकता आली असती, असा कट भाजपने रचल्याचा आरोप रामचंद्र गजबे यांनी केला आहे. निवडणूक लढवण्याऐवजी पैसे देऊन लोकशाही विकत घेण्याचा हा प्रकार आहे, असा घणाघात गजबे यांनी केला.
काँग्रेस मेळाव्यात मांडला गेला मुद्दा
नागपूरमध्ये पार पडलेल्या काँग्रेस उमेदवार मेळाव्यात हा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडण्यात आला. काँग्रेसचे स्थानिक नेते गिरीश पांडव यांनीही व्यासपीठावरून भाजपवर गंभीर आरोप करत, प्रभाग २९ मधील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रामचंद्र गजबे यांना १० लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा थेट दावा केला. भाजप पुन्हा लोकशाही मूल्यांची पायमल्ली करत पैसा आणि दबावाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रामचंद्र गजबे यांचा सत्कार
या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते रामचंद्र गजबे यांचा सत्कार करण्यात आला. प्रलोभनाला बळी न पडता निवडणुकीच्या मैदानात ठामपणे उभे राहिल्याबद्दल पक्षाने त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना सपकाळ यांनी लोकशाही विकत घेण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करत, भाजपला निवडणुका लढवण्याची ताकद उरलेली नाही, म्हणूनच ते पैशाच्या जोरावर बिनविरोध विजय मिळवू पाहत आहेत, असा आरोप केला.
दबावाला बळी न पडता निवडणूक लढवणार
आरोपांवर ठाम असून आपण कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निवडणूक लढवणार असल्याचे गजबे यांनी स्पष्ट केले. प्रभाग २९ मधील हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असून, याबाबत निवडणूक आयोगानेही दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
हेदेखील वाचा : Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान






