सौजन्य - नवराष्ट्र टीम
शहर विस्ताराच्या लाटेत दगड शिल्पाची जुनी परंपरा मागे पडू लागली आहे. एकेकाळी घराघरातील पाटा–वरवंटे, खलबत्ता, जातं, उखळ यांची जागा आता मिक्सर–ग्राइंडरने पूर्णतः घेतली आहे. तरीही शहरातील निगडी आणि चिंचवड स्टेशन परिसरातील रस्त्यांच्या कडेला प्लास्टिकच्या तात्पुरत्या शेडखाली काही वडार समाजातील कारागीर आजही दगडावर हातोडा–छिन्नी मारत ही परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
जगण्याचे साधन असलेल्या व्यवसायाला ‘घरघर’
पूर्वी घराघरात जात्यावर धान्य दळले जाई. खलबत्त्यात मसाले सुखद सुवासाने भरून जात. पाटा–वरवंट्यावर लसूण–मिरचीपासून किसापर्यंत अनेक कामे होत. परंतु गेल्या दोन दशकांत मिक्सरने या सर्व वस्तूंची जागा घेतली. एकदा विकत घेतलेल्या दगडी वस्तू अनेक वर्षे टिकतात, त्यामुळे त्यांची पुनर्विक्रीही अत्यल्प होत होती.
लोणावळ्याच्या दगडातून आकार घेतात पारंपरिक साधने
या व्यवसायात वापरले जाणारे दगड लोणावळा परिसरातून आणले जातात. कोणत्या दगडापासून कोणती वस्तू तयार होईल, याचा अंदाज कारागीर सहज घेतात. त्यानंतर दगडाला आवश्यक आकार देऊन पाटा–वरवंटा, खलबत्ता, जातं अशा वस्तू तयार केल्या जातात.
लग्नकार्य आणि शोभेच्या वस्तूंचीच मर्यादित मागणी
आजच्या काळात लग्नसमारंभात हळद दळण्यासाठी पारंपारीक पद्धतीने जात्यावर दळली जाते. मात्र घराघरात जातं उपलब्ध नसल्याने नागरिक नव्याने खरेदी करतात. तसेच रुखवतीसाठी खलबत्ता, दगडी तुळशी वृंदावन, छोटे पाटा–वरवंटे यांची मागणी टिकून आहे. हीच मागणी या कारागीरांना काही प्रमाणात आधार देते.
परंपरेचे राखणदार परंतु भविष्य अनिश्चित
वडार समाजातील दगडावर काम करणारे कारागीर या कलेचे अखेरचे पिढीगत प्रतिनिधी ठरत आहेत. बांधकाम मजुरीकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा टिकवण्यासाठी काही ज्येष्ठ कारागीर अजूनही अथक परिश्रम घेत आहेत, मात्र त्यांचे भविष्य अनिश्चित आहे.
अस्तित्वाची लढाई आणि प्रश्नचिन्ह असलेला वारसा
दगडाला आकार देणारा प्रत्येक वार ही केवळ कला नाही, तर एक संस्कृतीची कहाणी आहे. आधुनिक उपकरणांनी पारंपरिक दगडी वस्तूंना मागे टाकले असले, तरी त्याच्यातील उपयोगिता, चिरकाल टिकणारी मजबुती आणि सांस्कृतिक महत्व आजही तितकेच आहे. आधुनिक युगाच्या गतीने दगडशिल्प व्यवसाय मागे पडत असला, तरी काही जिद्दी हात अजूनही या परंपरेचा दिवा विझू देत नाहीत, हेच त्यांचे मोठेपण, आणि हाच त्यांचा संघर्ष आहे.
सध्या विक्री भाव
पाटा–वरवंटा : ४०० – ५०० पासून पुढे
दगडी दिवा : ५०० पासून पुढे
खलबत्ता : ५०० ते ९००
जातं : १००० – १५००
कुरूद (लाल दगडी जात) : ५०००
पूर्वी आमच्या हाताने घडवलेली जातं, खलबत्ते, उखळी यांची गावोगावी मागणी असायची. सण-समारंभ, लग्नकार्य, आणि घरच्या स्वयंपाकघरातही दगडी वस्तूंचा मान विशेष होता. पण मिक्सर–ग्राइंडरच्या वापरानं लोकांच्या सवयी बदलल्या, आणि आमच्या कलेला वेळ देणारा माणूसही उरला नाही. आता आमच्या वस्तूंना मागणी उरते ती फक्त लग्नकार्याच्या दिवसांत, जत्रा–यात्रांच्या किंवा सणासुदीच्या काळात. उरलेल्या काळात काम मिळतच नाही. -शिवाजी पवार, कारागीर , निगडी






