'खरातने तोंड उघडल्यास अर्धे मंत्रिमंडळ उघडं पडेल'; ठाकरे गटाच्या माजी खासदाराचं मोठं विधान
चिपळूण : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अनेक शक्यता असल्याचा सनसनाटी दावा शिवसेना (उद्धव गट) चे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. चिपळूण दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी खरात याच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेची मागणी केली.
विनायक राऊत म्हणाले की, तपासात जसे-जसे नेत्यांची नावे पुढे येतील, तसे खरात याला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो. खरात याने तोंड उघडल्यास राज्यातील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांचे खरे चेहरे समोर येतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणाला त्यांनी महाराष्ट्राचे एपस्टिन प्रकरण असे संबोधत सखोल चौकशीची गरज व्यक्त राजकीय नेत्यांची नावे समोर येण्याची केली.
दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्याकडून राजीनामा घेऊन प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. तसेच सर्व संबंधित व्हिडिओ सार्वजनिक करावेत आणि दोषींना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, दीपक केसरकर यांच्या एसआयटी चौकशीची मागणी करत, या प्रकरणात मोठ्या राजकीय षड्यंत्राची शक्यता असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
खरात, चाकणकरांवर मकोका लावा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) चे प्रवक्ते सुनील माने यांनी अशोक खरात व सहकाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत त्यांनी आरोप केला की, प्रभावशाली लोकांच्या संरक्षणाखाली अनैतिक कृत्ये सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
जमीन बळकावण्यासाठी सुपारी देऊन हत्या
स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर नाशिकच्या गौलाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी जमीन बळकावणे व भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप केला. २०२२ मधील तक्रारीनंतर न्यायालयीन निकालाआधीच भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला.
प्रकरणाचा तपास 5-6 महिन्यांपूर्वीच झाला
भोंदू अशोक खरात याच्याबाबत पीडित महिलेने वर्षभरापूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्याचा तपास पाच-सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. परंतु या सरकारमध्ये जे काही दोन तीन पक्ष सहभागी आहेत, त्या पक्षातील अनेक लोक या भोंदू बाबामुळे अडचणीत येणार होते. म्हणून गृह विभागाने नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास लोकांपुढे आणण्याचे काम केले आहे, असा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
हेदेखील वाचा : Ahilyanagar News : खरात प्रकरणात नगर जिल्ह्यातील प्रभावी नेत्याचा सहभाग? डॉ. सुजय विखे पाटलांचे संकेत






