मंचर : मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाने आंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या महाविद्यालयास २१ किलोमीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक मिळाल्याची माहिती प्राचार्य के. जी. कानडे यांनी दिली.
पुणे जिल्हा क्रीडा विभाग समिती अंतर्गत आंतर महाविद्यालय मैदानी मुले व मुली स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर यशस्वीरित्या संपन्न झाल्या. पुणे जिल्ह्यातील एकूण ७५ महाविद्यालयातील ७५० खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आवटे महाविद्यालयातील सुनील निघोट याने २१ किलोमीटर अंतर १ तास १३ सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदक तर सुरज भोर याने १तास १४ मिनिटात पूर्ण करून रौप्य पदक पटकावले. प्रिया भोर -२०० मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक, निकिता भोर -१५०० मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक, प्रिया भोर- १५०० धावणे स्पर्धेत कांस्य पदक, सुनील निघोट- १०००० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक, सुरज भोर याने कांस्य पदक मिळविले
-हॅमर थ्रो स्पर्धेत निकिता पडवळला सुवर्ण
तर हॅमर थ्रो स्पर्धेत निकिता पडवळला सुवर्ण पदक आणि ४४०० मी मिक्स रिले स्पर्धेत महाविद्यालयास रौप्य पदक प्राप्त झाले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संयोजन सचिव डॉ. सुहास भैरट व सहसचिव डॉ. विद्या पठारे, डॉ. सुनील पानसरे, डॉ. आशिष तळेकर व प्रा. ऋषिकेश कुंभार यांनी विशेष प्रयत्न केले. यशस्वी खेळाडूचे महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.