सौजन्य - नवराष्ट्र टीम
गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने ‘दादां’ना मोठा धक्का दिला आहे. भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अहेरी विधानसभेत बाप विरुद्ध लेक असा सामना रंगण्याची शक्यता आहे. शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे.
अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. पक्षप्रवेशानंतर भाग्यश्री आत्राम चांगल्याच आक्रमक झाल्यात.. धर्मरावबाबा शेर तर मी शेरनी आहे.. माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकणार, असा गंभीर इशारा भाग्यश्री आत्रामांनी धर्मरावबाबांना दिला आहे.
अजित पवार यांनी दिला होता इशारा
वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोलीत अत्रामांच्या मुलीला इशारा दिला होता. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी इशारा दिला होता.
कोण आहेत भाग्यश्री आत्राम हलगीकर?
– भाग्यश्री आत्राम या कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या
– पुण्यातील भारती विद्यापीठातून बीएससी पदवी
– बेळगावच्या ऋतुराज हलगेकर यांच्याशी विवाहबद्ध
– २०१३ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद
– २०१९ पासूनच बापलेकीत राजकीय वैर
एक गेलं तरी संपूर्ण कुंटुंब माझ्यामागे : धर्मरावबाबा आत्राम
धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, जे माझ्या खुर्चीवर बसण्याच स्वप्न पाहतील त्यांना बाजूला करण्याचे काम मी करणार आहे. मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना सर्वांना समान न्याय दिला आहे. मी सतत काम करत आलो आहे. आता हे मध्येच येऊन हे अशा प्रकारचे वातावरण तयार करत असतील तर त्यांना वाट लावायचे काम आपल्याला करायचे आहे. मी इमाने इतबारे काम केले. 50 वर्षे या भूमीचे रक्षण करण्याचे काम केले आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार आहे. एक गेला तरी कुटुंबाची संपूर्ण फौज आज माझ्यामागे उभी आहे.