संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आमदार बच्चू कडू यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे. एकच पक्ष वारंवार का फुटतो, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेची ताकद कशी वाढेल, याचा विचार केला पाहिजे. दोन गोष्टी एकनाथ शिंदे यांनी तर दोन गोष्टी उद्धव ठाकरे यांनी मागे घ्याव्यात. पुन्हा दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन कामाला लागावे. २०२९ हे शिवसेनेचे पर्व राहील, अशी अपेक्षा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. शनिवारी (दि. २०) एका कार्यक्रमासाठी ते शहरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
आमदार कडू पुढे म्हणाले, शिवसेना हे महाराष्ट्रातल्या मातीचे संघटन आहे. ते मजूबत राहणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न झाले पाहिजे. दोघे एकत्रित आले पाहिजे. दोघांत ताळमेळ झाला तर दोन्ही शिवसेनेची वज्रमूठ कशी तयार होईल हे पाहायला काय हरकत आहे. या माझ्या व्यक्तिगत भावना असल्याचे कडू म्हणाले.
दरम्यान, शिवसेना आता पूर्ण ताकदीने आणि मजबुतीने काम करेल. २०२९ हे शिवसेनेचे पर्व राहील. त्या दृष्टीने आम्ही सामोरे जाऊ. जीवाचे रान करू. २०२९ हे शिवसेनेला कलाटणी देणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देणारे वर्ष असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फुटाफुटीवर भाष्य करताना कडू म्हणाले, राजकारण हे बेरजेचे असते. ते कधीही वजाबाकीत जात नाही.
आपल्याच नेत्यावर आरोप लावणे चुकीचे
एखादा नेता फुटला म्हणजे तो पैसे घेऊनच फुटला असे म्हणणे योग्य होणार नाही. आपल्याच लोकांवर असा डाग लावणे बरोबर नाही. राज्यात विधान परिषदेच्या सहा ठिकाणी जागा बिनविरोध आल्या. राज्यात तीन- चार विरोधी पक्ष आहेत. असे असूनही त्यांनी सहा बिनविरोध जागा का होऊ दिल्या? तुम्हाला उभे करायला एक कार्यकर्ताही सापडला नाही? अशावेळी जे पळाले तर पैसे घेऊनच पळाले असा दोष देणे चुकीचे असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
कर्जमाफी फसलेली नाही
जिल्हा बँकेचे २९ हजार खातेदारांपैकी २८ हजार खातेदारांना कर्जमाफीचा फायदा होईल. कुणालाच फायदा होणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. बँकेचे कर्ज वाटपही पूर्ण झाले आहेत. ९० टक्के आम्ही कर्ज वाटप केले आहे, असे ते म्हणाले.






