File Photo : Kolhapur Rain
गगनबावडा : गेली 20 वर्षे प्रलंबित असलेला शाळा इमारत जागेच्या व बांधकामाच्या विषयासाठी पनोरे तालुका पन्हाळा गावातील सर्व पालक व तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थांनी शाळेची पाहणी केली. त्यानंतर शाळेच्या दयनीय अवस्थेसंदर्भात सकारात्मक चर्चा केली. पन्हाळा तालुक्यातील पणोरे हे गाव मोठ्या लोकसंख्येचे असून, गावाला क्षेत्रफळ देखील जास्त आहे. असे असले तरी देखील गावच्या प्राथमिक शाळेला स्वमालकीची जागा नसल्याने इमारतीचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी, ग्रामपंचायत पणोरे व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून वेळोवेळी निवेदने आंदोलने करून देखील प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शाळेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून, सध्या शाळेची पटसंख्या १८४ आहे. शाळेने केंद्र तालुका राज्य पातळीवर विविध स्तरावर नावलौकिक केला आहे. पण हे चिमुकले विद्यार्थी प्रशासनाच्या अंध कारभारामुळे विज्ञानाच्या प्रगत युगात देखील पाण्यात बसून शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, चर्चेअंती असे ठरविण्यात आले की, सदर जागेच्या मागणीसाठी वेळोवेळी शासन स्तरावर प्रस्ताव देऊन ही कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. ही जागा खाजगी मालकीची असून, शाळेच्या इमारतीमधील वर्ग हे पाण्यामध्ये आहेत. शाळेच्या इमारतीतील वर्ग पूर्णपणे मोडकळीस व पावसात गळती लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.