पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गावर व शहरात स्वागत मंडप, कमान घालण्यास प्रतिबंध (Photo : File Photo)
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा 6 जुलैला संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच अन्य पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. या भाविकांची यात्रा सुलभ व सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर, शहराच्या हद्दीवर आणि शहरात स्वागत कमान, स्वागत मंडप घालण्यास 15 जुलैपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी पारीत केले आहेत.
माळशिरस तालुक्यातून पालखी सोहळे, पिराची कुरोली येथे बंधू भेट होऊन पुढे पंढरपूरकडे निघतात. त्यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप घातले जातात. स्वागत कमानी उभारल्या जातात. तसेच पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत फलक, फ्लेक्स व बॅनर लावले जातात. पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविक पायी चालत पंढरपूरकडे येतात. विसाव्यासाठी तसेच न्याहारी व भोजनासाठी ते ठिकठिकाणी थांबतात. पालखी सोहळ्यासाठी स्वागत मंडप व स्वागत स्टेजमुळे सोहळ्यासोबत असणाऱ्या भाविकांना पुढे जाण्यास अडथळे निर्माण होतात.
दरम्यान, ठिकठिकाणी स्वागतासाठी थांबलेल्या भाविकांमुळे पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांना पुढे जाण्यास तसेच पालखी सोहळा वेळेत पुढील विसाव्यावर पोहचण्यास विलंब होतो. तसेच गर्दीचे व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
तसेच मार्गावर व रस्ता दुभाजकावर लावलेले फ्लेक्स व बॅनरमुळे भाविकांना रस्त्यावरील वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. तसेच होर्डिंग्ज व बॅनरची उंची जास्त असते. वादळी वाऱ्यामुळे किंवा वाहनांचा धक्का लागून ते कोसळू शकतात व त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.