Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! 'या' दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित
Baramati Water Supply: बारामती शहर व परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, परिणामकारक आणि दीर्घकालीन स्वरूपाची करण्याच्या दृष्टीने जळोची व तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.
बारामती शहर पाणीपुरवठा योजनेसह तालुक्यातील २३ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी विधान भवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, बारामती नगरपालिकेचे गटनेते संजय संघवी तसेच नगरसेवक अल्ताफ सय्यद उपस्थित होते.
बैठकीदरम्यान बारामती शहरातील जळोची-तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना आणि शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-१ अंतर्गत पूर्ण झालेली कामे तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. तसेच शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-२ मधील प्रलंबित कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
बारामती शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या साठवण तलावामध्ये आढळून आलेली गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक तांत्रिक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी बारामती तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील एकूण २३ योजनांपैकी प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना शाश्वत, दर्जेदार आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
बारामती शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांना गती देणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधत वेळबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.






