pune crime
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे झालेले हिट अँड रन प्रकरण आणि दोन दिवसांपूर्वी बोपोडी भागात पोलिस कॉन्सटेबलला कारने उडवल्याच्या प्रकाराने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. अशातच त्यात भर घालणारी आणखी एक घटना समोर आली आहे.
पुणेकर सोडा पण पुण्यातील पोलीस तरी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरीक विचारू लागले आहेत. चेक पॉइंटवर महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने गाडी अडवल्याच्या कारणाने एका वाहनचालकाने त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला होता या घटनेला महिना उलटत नाही, तोच सिंहगड रस्त्यावर पोलीस अंमलदाराला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील चेक पॉइंटवर रविवारी (७ जुलै) पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी हे त्यांच्या वाहनाने जात असताना होते. त्यावेळी ऋषिकेश गायकवाड यांनी मंगेश फडके आणि बापू दळवी यांची गाडी अडवली. पण केवळ गाडी अडवल्याच्या रागातून या दोन्ही तरुणांनी गायकवाड जबरदस्त मारहाण केली. मी कोण आहे? तुला माहीत नाही? तू नोकरी कशी करतो तेच बघतो, अशा धमक्याही दिल्या.
दुसरे अंमलदार मध्ये पडले असता या तरुणांनी त्यांनाही मारहाण केली. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रयत्न सुरू असताना आता पोलिसांवरच हल्ले होऊ लागले लागल्याने पुण्यात पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांत पुण्यात ड्रग्स विक्री, वाढते अपघात, कोयते घेऊन दहशत माजवणे असे प्रकार सुरू आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनाही मारहाण करणे, त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकाराने सध्या पुण्यात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.