फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्य़ान, विधान परिषदेमध्ये भाजप नेते प्रसाद लाड व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये शाब्दिक वाद विकोपाला गेले. यावेळी अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली असा आरोप केला जात आहे. यामुळे प्रसाद लाड यांनी भावना व्यक्त करत निलंबनाची मागणी केली होती. सभागृहामध्ये अर्वाच्च शब्द वापरल्यामुळे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आले आहे.
विधान परिषदेमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवराळ भाषा वापरली. यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन देखील करण्यात आले. यानंतर विधान परिषदेचे अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनामध्ये अंबादास दानवे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधीपक्षनेत्यांना निलंबित करण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत करण्यात आला आहे. यामुळे पुढील पाच दिवस अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
प्रसाद लाड यांनी निलंबनाची मागणी केल्यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या विधानावर ठाम राहत दानवे म्हणाले,’मला निलंबीत केले तरी फरक पडणार नाही. मी शिवसैनिक आहे. प्रसाद लाड स्वतः दलाल आहेत. त्यांच्या नावाच्या अनेक एजन्सी आहेत,” अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये हे प्रकरण गाजले असून ठाकरे गटाने यावर अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.