केंद्रीय मंत्री रामदास आठवले यानी घेतली देशमुख कुटुंबाची भेट (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. काल ज्याच्यावर या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून पाहिले जात आहे असा वाल्मीक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्याला रात्री बीडमध्ये आणण्यात आले. वाल्मीक कराडबाबत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सीआयडीने केली होती. ती विनंती मान्य करत केज कोर्टाने काल रात्रीच या प्रकरणावर सुनावणी घेतली. सुनावणीनंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. आता यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीड येथील संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले, ” बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असून त्याच्यावर कडक कलम लावून शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सुरवातीपासून सर्वांची आहे. आता वाल्मिक कराड कोठडीमध्ये असून त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ”
पुढे बोलताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले, “बीड जिल्ह्य़ात गुंडागर्दी करणारी, खंडणी मागणारी टोळी आहे. तसेच उद्योग व्यवसाय करणार्या लोकांना त्रास देणारे लोक आहेत. त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी टोळी घेऊन फिरणं, त्यामुळे ही बाब गंभीर असून अशा लोकांना कडक शासन झाल पाहिजे. तसेच त्या जिल्ह्यात वाल्मिक कराड हा कार्यकर्त्यांच्या नावाने गुंडगिरी करणारा आहे.आता त्याला अटक करण्यात आली असून त्याला शिक्षा झालीच पाहिजे.तसेच बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास,वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये.”
हेही वाचा: Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT स्थापन
मस्साजोगा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असून आतापर्यंत पूर्वीपेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडला तार खंडणी प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. केज पोलिसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस बसवराज तेली, पोलिस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्याशिवाय सपोनि विजयसिंग जोनवाल, पीएसआय महेश विघ्ने आणि पीएसआय आनंद शंकर शिंदे, सहायक पीएसआय तुळशीराम जगताप हे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले अन्य पोलीस कर्मचारी आहेत. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात हत्येसह चार गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. अपहरण आणि हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी, ॲट्रॉसिटी आणि प्राणघातक हल्ला असे चार गुन्हे दाखल आहेत.