मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
सध्या बीड हत्या प्रकरण जोरदार तापले आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मिक कराड याला अटक होत नसल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव पुढे आले असून त्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे देखील नाव समोर येत आहे. सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच प्राजक्ता माळी ही परळीला सतत येत असल्याचा गंभीर आरोप देखील केले आहेत. यावर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्ता माळी आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाली, “लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, त्यावेळी बोलणे आवश्यक असते. कोणीही माझ्यावर कधी शंका उपस्थित केली आहे. काल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज मला बोलणे गरजेचे वाटले. माझ्या चारित्र्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे कुटुंबातील कोणीही माझ्याकडे शंकेने पाहिले नाही. तुम्ही एक राजकारणी आहात. आम्ही एक कलाकार आहोत. या सर्वमध्ये तुम्ही कलाकारांना का ओढता असा माझा सुरेश धस यांना सवाल आहे.”
पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, “बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये तुमची गाडी कलाकारांवर का घसरते? ही कितपत योग्य आहे. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावे घेतली. स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावे घेतली. मी याबाबर महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. मला खात्री आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग यावर कठोर कारवाई करतील. जर काही घडले नाही तर मी माझ्या वकिलांमार्फत योग्य ती कारवाई करेन.”
काय म्हणाले होते सुरेश धस?
परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदा ताबा मिळवला आहे. विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणलं जातं. जर कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल, त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा, अशी खोचक टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
“जर कोणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.” सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात त्यांच्या तारखा कशा मिळविल्या जातात, याबाबतही सुरेश धस यांनी सांगितलं.
हेही वाचा: Suresh Dhas : ‘प्राजक्ता माळी परळीत कशासाठी येतात’; भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलं खरं कारण
बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली.यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झालं आहे. परळी पॅटर्नचाही उल्लेख करत त्यांनी सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचाही उल्लेख केला.






