मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Bhagat Singh Koshyari Resignation) काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यांचा राजीनामा आज मंजूर करण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. त्यात आता माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावर मोठं भाष्य केले आहे. ‘माझ्यावर भाजपचा खूप दबाव आहे. त्यांनी माझ्याकडे तशी कबुली दिल्याचे खैरे यांनी सांगितले.
खैरे म्हणाले, ‘एकदा मी राज्यपालांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना विचारले होते की, ’12 आमदारांच्या नियुक्तीचं काय झाले? तर त्यांनी सांगितले की, माझ्यावर भाजपचा खूप दबाव आहे. त्यांनी माझ्याकडे तशी कबुली दिली होती. त्यांच्यावर भाजप आणि वरिष्ठांकडून दबाव होता. त्यामुळे त्यांना असे वागावे लागत आहे. त्यांनी स्पष्टपणे मला सांगितले’. तसेच मला येथून पळून जावे असं वाटत असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले असल्याचा दावाही खैरे यांनी केला.
भाजपने निर्णय घेण्यासाठी खूप उशीर केला
भाजपने राज्यपाल बदलण्याचा निर्णय खूप उशिरा घेतला. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्या पदाची काय अवस्था आज झाली आहे? लोकांना आंदोलने करावी लागली, निषेध करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
राज्यपाल हे घटनात्मक पद
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर बसणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था झाली आहे. लोकांनी त्यांचा निषेध केला, त्यांना जोडे मारले. त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे जाळले. हे फक्त त्यांच्या स्वभावामुळे झाले आहे. त्यांनी आमच्या औरंगाबाद शहरात येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. त्यांनी आधीच जायला पाहिजे होते, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.