भगवान बाबा गड महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री हे धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहेत (फोटो - सोशल मीडिया)
बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामुळे राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेते राजीनामा मागत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे आता धनंजय मुंडे हे चर्चेत आले असून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा आहे. यावर आता भगवान गडाच्या महंतांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबरोबर काय चर्चा झाली? याविषयची माहिती डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली. “भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहे”, असंही महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
डॉ. नामदेव महाराज शास्त्रीय यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असे स्पष्ट मत महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी
महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे का? यावर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं की, “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत. तसेच बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध सुरु आहे”, असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“मला माध्यमांना असं विचारावसं वाटतं की ज्या लोकांनी मस्साजोगचं प्रकरण केलं. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या गावाचा मुद्दा आहे. मात्र, त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. आज ज्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे ते नेते खंडणीवर जगणारे नाहीत. गेले जवळपास ५३ दिवस झाले आहेत मीडिया ट्रायल चालवले जात आहेत. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारा माणूस नाही. मात्र, त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांची पार्श्वभूमी तशी नाही”, अशी भूमिका नामदेव महाराज शास्त्री यांनी घेतली आहे. त्यामुळे बीडमधील राजकीय परिस्थिती धनंजय मुंडे यांच्याविरोधात असले तरी देखील भगवानबाबा गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे.