भंडारा : राजकीय घटनांमुळे चर्चेची ठरलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या माजी आमदाराने काँगेससाठी मतं फोडल्याने पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी आऊट केले आहे. भंडाऱ्याचे भाजपा नेते आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसचा उमेदवार अध्यक्षपदी विराजमान व्हावा, यासाठी भाजपाची पाच मतं फोडली. परिणामी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राज्याचे माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली.
भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने अध्यक्षस्थानी जागा निश्चित केली असून, उपाध्यक्षपद भाजपाच्या वाट्याला गेले आहे. काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष झाले असून उपाध्यक्षपदी भाजपचे संदीप टाले यांची निवड झालेली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र येथे ताकद दाखविता आलेली नाही. भाजपच्या १२ पैकी पाच मते हे चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात फुटलेली आहेत. ५२ सदस्य जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस पक्षाला २१ जागा आणि भाजपला १२ जागा तर राष्ट्रवादीला १३ जागा मिळाल्या आहे. तर तीन अपक्ष, एक जागा शिवसेना, एक जागा वंचित आणि एक बीएसपी पक्षाला जागा मिळालेली आहे. मॅजिक फिगर २७ असल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २१ जागा मिळालेल्या काँग्रेस पक्ष प्रबल दावेदार होता.
मुळात काँग्रेस आपल्या परंपरागत मित्राला राष्ट्रवादीलासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल असे मानले जात होते. पण पंचायत समिती निवडणुकीत सर्व समीकरण बदलून गेले. नाराज राष्ट्रवादीने आपल्यावर मागील कालावधीत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी भाजपसोबत वेगळी चूल मांडली. यामुळे, काँग्रेस जिल्ह्यात एकटी पडली होती. आता पंचायत समिती प्रमाणे जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी भाजपसोबत सत्ता स्थापन करेल असे वाटले जात असताना भाजपचे चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात एक गट काँग्रेसला मिळाला. त्यामुळे सत्तेची समीकरण बदलले आणि काँग्रेस-भाजपची युती झाली.