राज्यातील पहिल्या पाळीव प्राणी अंत्यविधी स्मशानभूमीचे लोकार्पण
मिरा-भाईंदर : पाळीव प्राणी म्हणजे त्या कुटुंबातील एक सदस्यच मानला जातो. तेव्हा अगदी घरातल्या हक्काच्या माणसाची जशी आपण काळजी घेतो, तशीच पाळीव प्राण्यांची पण काळजी वाहणारे प्राणीप्रेमीही बहुसंख्य आहेत. मात्र हेच पाळीव प्राणी मृत नंतर कुठेही टाकले जाते. परिणाम दूर्गंधी आणि आजार फैलावतात. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्यात आली.
पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची व्यवस्था आता प्रत्यक्षात आली आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्मशानभूमीचे म्हणजेचे नवघर स्मशानभूमीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून करण्यात आले.
आतापर्यंत पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह नदी-नाले, खाडीकिनारा, गटारे, कचरा कुंडी किंवा लांब खुल्या ठिकाणी टाकले जात असल्याने दुर्गंध आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होतो. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या पसरण्याचे प्रमाण ही वाढत होते. तसेच राज्यात कुठेही पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची सुसज्ज सुविधा नव्हती. परंतु आता मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले असून प्राणीप्रेमींसाठी ही एक दिलासा देणारी आणि आदर्शवत अशी सुविधा उपलब्ध झाली आहे.
नवघर स्मशानभूमी येथे साकारण्यात आलेली पाळीव प्राण्यांची शवदाहिनी ही पूर्णपणे गॅस शवदाहिनी असणार आहे. ही एक पर्यावरणपूरक सुविधा असून प्राण्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नैसर्गिक वायू आणि प्रोपेन (LPG) चा वापर या शवदाहिनी मध्ये केला जातो. या प्रक्रियेमुळे मृतदेहाचे मुलभूत रासायनिक संयुगामध्ये रुपांतर होते, जसे कि वायू आणि राख. पाळीव प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या शवदाहिनीमुळे लाकूड जाळून होणारे प्रदूषण देखील रोखले जाईल. मिरा-भाईंदर शहरात नवघर आणि काशिमिरा येथे अशा दोन ठिकाणी पाळीव लोकार्पण झाले असून लवकरच दुसऱ्या म्हणजे काशिमिरा येथील स्मशानभूमीचे हि लोकार्पण केले जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
लोकार्पणानंतर मिरा-भाईंदर शहरात प्राणीप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, पर्यावरण संवर्धन आणि प्राण्यांप्रती असलेली आपुलकी या दोन्ही गोष्टींचा संगम साधल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले की “पाळीव प्राणी हे अनेक घरात कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. त्यांच्या अंत्यविधीसाठी सन्मानपूर्वक आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. मिरा-भाईंदरमध्ये उभारण्यात आलेली राज्यातील ही पहिली पाळीव प्राण्याची स्मशानभूमी राज्यातील इतर शहरांसाठी आदर्श निर्माण करेल. भविष्यात इतर शहरांमध्ये हि अशा सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लोकार्पणामुळे मिरा-भाईंदर शहरात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि प्राणीप्रेमींच्या भावनांचा सन्मान या तिन्हीचा संगम साधला गेला आहे.”