पुणे विभागातील धरणे ओसंडून वाहिली; धरणांमध्ये 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध (फोटो - सोशल मीडिया)
रांजणी : दमदार पाऊस कोसळल्याने अनेक धरणे जुलै महिन्यामध्येच भरली होती. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे आता धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. पुणे विभागात सुमारे 720 लहान मोठी धरणे असून, या धरणांमध्ये सुमारे 92 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी याच दिवशी पुणे विभागातील पाणीसाठा ४९३ .८१ टीएमसी होता. मात्र, यावर्षी तो पाणीसाठा सुमारे तीन टक्क्यांनी वाढल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जुलैपासून बहुतेक धरणे पूर्णपणे भरली असून, या धरणांमधून सातत्याने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडावा लागत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पूरहानी, वित्तहानी इतर नुकसान होऊ नये याकरिता सतर्कता बाळगणे देखील तितकेच महत्त्वाचे राहणार असल्याचे जलसंपत्ती अभ्यासक आणि जलसिंचन तज्ञ इंजिनियर हरिश्चंद्र चकोर यांनी म्हटले आहे. पुणे विभागात महत्त्वपूर्ण असणाऱ्या कुकडी प्रकल्पातील पाचही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला असून, त्यामध्ये डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तर माणिकडोह धरणात 75 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
हेदेखील वाचा : India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन
दरम्यान, पिंपळगाव जोगे धरणात देखील सुमारे 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, येडगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वडज धरण देखील पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डी. एस. कोकणे यांनी सांगितले.
पुणे विभागातील लहान मध्यम आणि मोठी धरणे असून त्यामध्ये उजनी आणि कोयना धरण सर्वात मोठी धरणे म्हणून गणली जातात . या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे . गतवर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी यंदाचा पाणीसाठा वाढला असून पुणे विभागातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे . या विभागातील सर्वच धरणे पाण्याने तुडुंब भरली असून आवश्यकतेनुसार यापुढील काळात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले .
एकंदरीत पुणे विभागातील यंदाच्या धरणांची पाण्याची पातळी लक्षात घेता दमदार पाऊस पडल्याने पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे . यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मात्र अतोनात नुकसान झाल्याची दिसून येते एकीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू आहे तर पाण्याचा प्रश्न मिटल्याने दुसरीकडे चेहऱ्यावर हसू असल्याचे दिसून येते.