आरएसएस संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची भाजप मुस्लीम नेते जमाल सिद्दीकी यांची मागणी आहे (फोटो - सोशल मीडिया)
RSS Dr. Hedgewar Bharat Ratna : नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे शताब्दी वर्ष साजरे करत असून यानिमित्ताने संघाकडून अनेक कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्यांकडून देखील मोठ्या उत्साहाने संघाचे 100 वर्षे पूर्ती साजरी केली जात आहे. दरम्यान, संघ शताब्दीच्या निमित्ताने संघ संस्थापक डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका मुस्लीम नेत्याने हेडगेवार यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. सिद्दीकी यांनी आपल्या पत्रात डॉ. केशव हेडगेवार यांचे वर्णन स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रनिर्माता असे केले आहे. देशसेवा आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचाही उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसएसच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून एक टपाल तिकिट आणि नाणे देखील जारी केले आहे. यानंतर आता संघ स्थापक हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘हेडगेवार यांना भारतरत्न देण्यात यावा’
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले, “हेडगेवार यांचे योगदान – स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सक्रिय सहभाग, राष्ट्र उभारणीतील त्यांचे संघटन कौशल्य आणि एकात्म भारतीय समाजासाठी त्यांचे स्वप्न पाहता त्यांना भारतरत्न प्रदान करणे योग्य ठरेल. हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक बलिदानाची ओळख पटवेल असे नाही तर सर्व स्वयंसेवकांना राष्ट्रासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देईल.” अशी मागणी जमाल सिद्दीकी यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसएसच्या (RSS) स्थापनेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. यावेळी त्यांनी आरएसएसचे खूप कौतुक केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आरएसएसचा गौरवशाली १०० वर्षांचा प्रवास हा त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी आणि शिस्तीचे एक असाधारण उदाहरण आहे. स्वयंसेवक पिढीला संघाचे शताब्दी वर्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे. तसेच आरएसएसने स्थापनेपासूनच राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. १९६३ मध्ये, संघ स्वयंसेवकांनी २६ जानेवारीच्या परेडमध्येही भाग घेतला होता. त्यांनी देशभक्तीच्या तालावर मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने कूच केली. हे टपाल तिकीट राष्ट्रसेवा करणाऱ्या आणि समाजाला सक्षम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या समर्पणाचे प्रतिबिंब देखील आहे. आज, भारत सरकारने संघाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करण्यासाठी विशेष टपाल तिकिटे आणि स्मारक नाणी जारी केली आहेत. १०० रुपयांच्या या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंह आहे.”, अशी माहिती मोदींनी दिली.