कल्याण : कल्याण ग्रामीणमधील २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा अध्यक्ष होणार अशी माहिती समोर आली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत. केवळ आश्वासने दिली गेली असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. मात्र या अध्यक्ष पदामागे महायुतीला महाविकास आघाडीकडून झटका देण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्थानिक लोक सध्याच्या राजकारणाला कंटाळले असल्याची चर्चा आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये २७ गावांची सर्व पक्षीय संघर्ष समिती आहे. ही समिती गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या समितीने गावे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी लढा दिला होता. २००२ साली गावे महापालिकेतून वगळण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही गावे २०१५ साली महापालिकेस समाविष्ट केली गेली. गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास समितीचा विरोध होता. या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी होती. २७ पैकी १८ गावे वगळून त्याची नगरपालिका करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर सर्व पक्षीय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या. मुख्यमंत्री आणि खासदारांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले, ते निर्णय राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र आत्ता सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा होणार असल्याचे सांगण्यात आले.
२२ सप्टेंबर रोजी समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील आणि अर्जूनबुवा चौधरी यांच्या नेतृत्वात खासदार म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांनी समितीचे अध्यक्ष पद स्विकारावे अशी विनंती केली आहे. त्याला खासदारांनी तूर्तास सहमती दर्शविली आहे. त्याची अधिकृत घोषणा दोन ते तीन दिवसात होणार असल्याचे सांगण्यात आले. या विषयी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, गावाबाहेरचा अध्यक्ष ही काही नवी बाब नाही, या पूर्वी रतन म्हात्रे, राजाराम साळवी हे देखील बाहेरचे होते. तरी देखील ते समितीचे अध्यक्ष होते, आत्ता खासदार म्हात्रे हे अध्यक्ष होणार आहे. समितीला अनेक आश्वासने दिली गेली, गावे वगळण्यात येतील. टॅक्स कमी करु ही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, टॅक्स कमी करु असे सांगितले. अद्याप बिले आलेली नाही, असे अनेक प्रश्न आहे. नवे अध्यक्ष हे प्रश्न सोडवितील अशी आशा आहे.
मात्र गेल्या महिन्यापासून समितीमध्ये मतभेद असल्याचे चर्चा आहे. समितीचे पदाधिकारी गुलाब वझे आणि काही पदाधिकाऱ्यांची खासदार शिंदे यांच्याशी जवळीक आहे. यातील काही सदस्य अन्य पक्षाचे आहे. त्यामुळे स्थानिक सध्याला राजकारणाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे का अशी चर्चा रंगली आहे.