बीसीसीआय(फोटो-सोशल मीडिया)
भारत सरकारने संसदेत ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ मंजूर केल्यामुळे अनेक ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर टाळेबंदीचे संकट आले आहे. याचा थेट परिणाम आता बीसीसीआयवरही दिसून येत आहे. नुकताच ड्रीम११ ने भारतीय संघाच्या जर्सी स्पॉन्सरशिपचा करार संपुष्टात आणला. आता त्यानंतर आणखी एका मोठ्या कंपनीकडून बीसीसीआयला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे बीसीसीआयला तब्बल १२५ कोटी रुपयांचे मोठे नुकसान होऊ शकते.
ड्रीम११ ला मागे टाकत माय११ सर्कलने आयपीएलसाठी बीसीसीआयसोबत १२५ कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र, नवीन कायद्यामुळे आता माय११ सर्कलवरही बंद होण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे, ही कंपनीदेखील लवकरच बीसीसीआयची साथ सोडू शकते. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयला एका नव्या पार्टनरचा शोध घ्यावा लागेल.
The BCCI’s 125cr deal with IPL’s associate sponsor My11 Circle set to be scrapped. (Cricbuzz). pic.twitter.com/mW9h9rt0DL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2025
केवळ बीसीसीआयलाच नाही, तर खेळाडूंनाही याचा मोठा फटका बसणार आहे. अनेक मोठे खेळाडू ड्रीम११ आणि माय११ सर्कल यांसारख्या कंपन्यांशी जोडले गेले आहेत. या कंपन्या बंद झाल्यास खेळाडूंचे कोट्यवधी रुपयांचे करार संपुष्टात येतील.
या निर्णयामुळे केवळ बीसीसीआयच नाही, तर आयपीएलच्या फ्रँचायझींनाही आर्थिक नुकसान होणार आहे. सर्व संघांना याचा फटका बसेल, पण विशेषतः कोलकाता नाईट रायडर्स (KKR), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या तीन संघांवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. या संघांनाही आयपीएल २०२६ पूर्वी नव्या स्पॉन्सरचा शोध घ्यावा लागेल. दरम्यान, भारतीय संघाच्या जर्सी स्पॉन्सरशिपसाठी टोयोटा कंपनीचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे.
ड्रीम११ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ २०२३ मध्ये जोडले गेले होते आणि २०२६ पर्यंत दोघांमध्ये करार होता. ड्रीम११ ला २०२६ पर्यंत बीसीसीआयला ३५८ कोटी रुपये द्यावे लागले होते, परंतु आता हा करार मध्येच मोडला गेला आहे, ज्यामुळे बीसीसीआयला तोटा सहन करावा लागला आहे.