फोटो - सोशल मीडिया
नागपूर : राज्याच्या राजकारणामध्ये रोज नेत्यांची खडाजंगी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मातोश्रीबाहेर झालेल्या गर्दीवरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार निशाणा साधला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले. तसेच विधानसभा महाविकास आघाडीच जिंकणार असा विश्वास देखील व्यक्त केला. यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 100 जन्म घ्यावे लागतील अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीकास्त्र डागलं. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यासाठी अनेक षडयंत्र रचली. मात्र त्यांच्या हाती अखेर काहीच लागलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे त्यांचे राजकारण संपवणे शक्य नाही. उद्धव ठाकरेंना यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. उद्धव ठाकरे यांचा अहंकार जनता जनार्दन उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही
ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी नाकावर टिच्चून राज्यात सरकार स्थापन करणारच असे आव्हान पंतप्रधान मोदींना दिले. यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही. उद्धव ठाकरे यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपसोबत विधानसभेत लढले. नंतर महाविकास आघाडीत गेले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्री होण्याची संधी चालून येताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. तो फसल्याने आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा ठाकरे करत आहेत, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.