उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक(संग्रहित फोटो)
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरु झाली असली तरी भाजपने तयारीमध्ये आघाडी घेतली आहे. अनेक बैठकांबरोबरच पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. भाजपाने तयारीमध्ये आघाडी घेतली असली तरी पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून मागील वेळी निवडून आलेल्या चाळीस जागा धोक्यात असल्याची माहीती पुढे आली आहे. त्यामुळे भाजपाने त्यानुसार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता होती. शंभर नगरसेवकांचे बळ असलेला भाजप पुण्यात स्वबळावरच निवडणुक लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुतीमध्ये असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्ष हा भाजपनंतर सर्वांत मोठा पक्ष महापालिकेत आहे. राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद चांगली आहे. शिवसेना (शिंदे गट ), शिवसेना (ठाकरे गट), मनसे यांचे संख्याबळ एक आकडीच आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तुलनेत भाजपने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे.
भाजपने सर्वे केला असून, त्या निकषांच्या आधारेच उमेदवारी निश्चित केली जाईल, अशी चर्चा आहे. भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तीन सर्वे करण्यात येणार आहेत. त्यातील पहिला सर्वे आता समोर आला आहे. या सर्वेतून अनेक प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात भाजपची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची संख्या, सदस्य संख्या इतर पक्षांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे पक्षाची ताकद जास्त असल्याने भाजपमध्ये निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रत्येक प्रभागात भाजपने इच्छुकांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली आहे. यामध्ये माजी नगरसेवकांना पहिल्या गटांमध्ये ठेवण्यात आला आहे. पहील्या सर्वेमध्ये २०१७ मध्ये निवडून आलेल्या ४० नगरसेवकांविषयी नाराजी असल्याची, तसेच त्यांची लोकप्रियता घटल्याची माहीती पुढे आली आहे. तसेच नागरीकांशी संपर्क कमी झालेले किंवा कामात कमी पडलेल्या नगरसेवकांना यावेळी उमेदवारी नाकारली जाऊ शकते.
पक्षाच्या नेत्यांकडून कामाला लागण्याच्या सूचना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांकडून पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा, नागरीकांच्या संपर्कात रहा, अशा विविध प्रकारच्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत.
इतर पक्षांकडून अपेक्षित तयारी दिसत नाही
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्ष आणि शिंदेंची शिवसेना हे पक्ष असून, त्यांच्याकडून अपेक्षित तयारी दिसत नाही. अजित पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी राजीनामा दिला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून तुर्तास ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉंंग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढणार, की स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुण्यात आंदोलनाच्या निमित्ताने या तीनही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र दिसतात, परंतू निवडणुकीच्या संदर्भात अद्याप कोणतीही बैठक एकत्रित झाली नाही.